पहिल्या दीक्षांत सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : केएलएस आयएमईआर संस्थेचा पहिला पदवीदान समारंभ शुक्रवार दि. 21 रोजी होणार आहे. सकाळी 11 वा. आयएमईआरच्या सभागृहात दीक्षांत सोहळा पार पडणार असून, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्याला सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयएमईआरचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक-देसाई यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एमबीए अभ्यासक्रमासाठी एक नामांकित संस्था म्हणून आयएमईआरची ओळख आहे. सध्या ही संस्था स्वायत्त असून संशोधनासाठी काम करत आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडविण्यात आले असून सध्या ते विविध कंपन्या व संस्थांमध्ये काम करीत आहेत. फेडरल बँक येथे एका विद्यार्थिनीला वार्षिक 13.58 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. सध्या उद्योगांना आवश्यक असणारी कौशल्ये संस्थेमधून दिली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले आहेत. संस्थेचा पहिला पदवीदान समारंभ शुक्रवारी होणार असून या कार्यक्रमाला बेंगळूर येथील आयआयटीचे माजी संचालक प्रा. एस. सदगोपन उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनंत मंडगी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर आरसीयूचे कुलगुरु प्रा. रामचंद्रगौडा, के.एल.एस.चे चेअरमन प्रदीप सावकार, विवेक कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेवेळी संचालक अरिफ शेख, श्रीरंग देशपांडे, अमित कुलकर्णी, श्रीकांत नाईक यासह इतर उपस्थित होते.









