पदवीधर बेरोजगारांना युवानिधीची आशा : अंमलबजावणीकडे लक्ष
बेळगाव : राज्य सरकारने पाच गॅरंटी योजनांपैकी चार योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र पदवीधर बेरोजगारांचा युवानिधी लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पदवीधर युवानिधी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेंतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षात पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारने प्रथम शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बसप्रवास दिला. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्यांला 5 किलो तांदळाऐवजी 170 रुपये दिले. यापाठोपाठ गृहज्योती अंतर्गत 200 युनिट मोफत वीज दिली जात आहे. शिवाय 27 ऑगस्ट रोजी गृहलक्ष्मी अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेच्या नावावर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या चार गॅरंटी योजना लागू झाल्या आहेत. मात्र आता केवळ युवानिधी योजना शिल्लक राहिली आहे. त्यामुळे पदवीधर बेरोजगारांच्या नजरा युवानिधीकडे लागल्या आहेत.
पदवी मिळविल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत नोकरी मिळाली नसल्यास अशा विद्यार्थ्यांना दरमहा (दोन वर्षांपर्यंत) ही मदत मिळणार आहे. याअंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा तीनहजार रुपये तर डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेषत: यात पारदर्शकता राहावी यासाठी ही रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत लाभार्थी विद्यार्थ्यांला नोकरी लागल्यास ही सवलत थांबविली जाणार आहे. शिवाय या योजनेसाठी अपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या योजनेच्या लाभासाठी मतदान ओळखपत्र, पदवीप्रमाणपत्र आधारकार्ड, बँक पासबुक आदी आवश्यक आहे. पाच गॅरंटी योजनांपैकी तीन योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवाय गृहलक्ष्मीदेखील येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चार योजना सुरू झाल्या असल्या तरी अद्याप पाचव्या योजनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे युवानिधी लांबणीवर पडणार की काय? अशी चिंता पदवीधर बेरोजगारांतून व्यक्त होत आहे.









