नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे या दिवशी गाईला आलिंगन द्या (काऊ हग डे) असे केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाने केलेले आवाहन मागे घेण्यात आले आहे. गो-आलिंगनामुळे प्राण्यांसंबंधीची माणसाची आपुलकी वाढेल आणि प्राण्यांसह माणसांनाही समाधानाचा अनुभव येईल, असे या आवाहनात प्रतिपादन केले होते.
मात्र, केंद्र सरकारच्याच मत्स्य आणि प्राणी संगोपन विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे हे आवाहन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव एस. के. दत्ता यांनी दिली. देशात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मूळची भारतीय संस्कृती आणि परंपरा संपण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे भारतीय आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे आवाहन करण्यात आले होते, असे मंडळाने आधी स्पष्ट केले होते. तथापि, आता काही कारणास्तव हे आवाहन मागे घेण्यात आले आहे. याची लोकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती देण्यात आली.









