पेडण्यातील ग्रामस्थांना मुख्यमत्र्यांनी दिली ग्वाही
पणजी : पेडणे तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी काल बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि पेडण्याचा जमीन रुपांतर आराखडा त्वरित रद्द करण्याची मागणी केली. पेडण्यातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही आराखडा तयार केला जाणार नाही, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. कोणत्याही परिस्थितीत सरकार पेडणेच्या विरोधात जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, सदर आराखडा रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
आराखडा रद्दच करण्याचा आग्रह
डॉ. सावंत यांच्या भेटीस गेलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. सर्व ग्रामस्थांनी मिळून निवेदन सावंत यांना यावेळी सादर केले. आराखडा रद्द करावा, अशी विनंती केली. स्थगित ठेवायची कृती चुकीची असून तो रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर तो आराखडा पुन्हा खुला करून लागू करण्याचे प्रयत्न होतील, अशी भीती ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर ग्रामस्थांनी आराखडा प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
भलत्याच जागेचा आराखड्यात समावेश!
अनेक घरे असलेली जागा रुपांतरीत करण्याची गरज असताना ती न करता भलतीच जागा आराखड्यात ‘सेटलमेंट झोन’ म्हणून दाखविण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. हा आराखडा तयार करताना कोणालाच विश्वासात घेण्यात आलेले नाही. नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी ज्यांच्या उपस्थितीत आराखडा स्थगित केल्याचे जाहीर केले, त्यांनाही आराखड्यासंदर्भात विचारण्यात आले नव्हते, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.









