ऑनलाईन टीम / तरुण भारत :
338 व्या आषाढी वारी सोहळ्याला कालपासून सुरूवात झाली आहे. वारीमध्ये भक्तीरसाबरोबर समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत असते. समाजाला लागलेली अंधश्रद्धा व व्यसनाची कीड समूळ नष्ट करण्याचे काम वारीतील दिंडय़ांच्या माध्यमातून होत असते. राज्य सरकारने या कार्याची दखल घेऊन प्रत्येक दिंडीला 50 हजार देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी द्यावे, अशी मागणी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पटोले म्हणाले, आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांसह अन्य पालख्या पंढरपूरकडे जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव नसलेली समाजासमोर एक आदर्श निर्माण घालून देणारी ही वारी पंरपरा आहे. या पालखी सोहळय़ात लाखेंच्या संख्येने अबाल-वृद्ध भक्तीरसात तल्लीन होत असतात. वारीमध्ये भक्तीरसाबरोबर समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत असते.
व्यसमुक्तीसाठीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातात पण हे काम केवळ कायद्याच्या माध्यमातून होत नाही त्याला समाजप्रबोधनाची जोडही असावे लागते, तेच काम वारीतील दिंडय़ा करत आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंडय़ांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला 50 हजार रुपये द्यावेत.