शॅकसाठी सरकारने मागवले अर्ज : अंतिम मुदत 27 ऑक्टोबरपर्यंत
पणजी : पर्यटन हंगाम सुरू होऊनही शॅकचे वितरण न झाल्याने व्यावसायिकांत नाराजी पसरली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांनी व आमदार मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढत शॅक व्यावस]ियकांना दिलासा दिला आहे. 350 शॅक उभारणीसाठी सरकारने अर्ज मागविले आहेत. पर्यटन संचालक सुनील आंचिपाका यांनी यासंबंधीची सूचना जारी करीत शॅक उभारणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. राज्य पर्यटन विभागाने 2023-26 पर्यटन हंगामासाठी म्हणजे 3 वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामी संरचना, समुद्र किनाऱ्यावरील शॅक, डेक बेड आणि छत्र्यांच्या उभारणीसाठी गोवा राज्य शॅक धोरणांतर्गत हे अर्ज मागवले आहेत. उत्तर गोव्यात एकूण 254 आणि दक्षिण गोव्यात 105 शॅकचे वाटप करण्यात येणार आहेत.
उत्तर गोव्यात शॅक उभारणीसाठी पर्यटन भवन, पाटो, पणजी येथे तर दक्षिण गोव्यातील शॅक व्यावसायिकांसाठी माथानी साल्ढाणा कॉम्प्लेक्स, मडगाव येथे 27 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, अशी सूचना केली आहे. शॅक अर्जदारांच्या निवडीसाठी आणि जागेच्या निवडीसाठी 3 नोव्हेंबर रोजी लॉटरी काढून शॅकचे वितरण करण्यात येणार आहे. एकूण 359 शॅकपैकी 34 (अंदाजे 10 टक्के) एक ते चार वर्षांचा अनुभव असलेल्या अर्जदारांना वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय अतिरिक्त 34 शॅक हे अनुभव नसलेल्या म्हणजे नव्यानेच अर्ज करणाऱ्या व्यावसायिकांना वाटप करण्यात येणार आहेत. उर्वरित 291 शॅक 5 वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या अनुभवी शॅक ऑपरेटरना वाटप केले जातील. अर्जासोबत 10 हजार ऊपये शुल्क (विना परतावा) भरणे आवश्यक आहे, असे राज्य पर्यटन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.









