राष्ट्रपतींना भेटणार खाप प्रतिनिधी : कुस्तीपटू अन् बृजभूषण यांच्यात वाद
वृत्तसंस्था /मुजफ्फरनगर
भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमधील वादाप्रकरणी खाप प्रतिनिधी राष्ट्रपतींना भेटतील, तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्याची तक्रार करतील, असा निर्णय उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये गुरुवारी झालेल्या खाप पंचायतीत घेण्यात आला आहे. कुस्तीपटूंना सरकार जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे. या कुस्तीपटूंची जात तिरंगा असून त्यांची लढाई सर्व समुदायाचे लोक मिळून लढत आहेत. आम्ही राष्ट्रपती अन् सरकारला भेटणार आहोत. खाप आणि कुस्तीपटू हार मानणार नाहीत. उर्वरित निर्णय 2 जून रोजी कुरुक्षेत्र येथे होणाऱ्या महापंचायतीत घेतले जाईल असे खाप पंचायतमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. कुस्तीपटूंची मागणी पूर्वी वेगळी होती आणि आता त्यांच्या मागण्या बदलल्या आहेत. कुस्तीपटू सातत्याने स्वत:च्या अटी बदलत आहेत. माझ्यावरील एकही गुन्हा सिद्ध झाला तर मी फासावर लटकण्यास तयार आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा अशी माझी सर्वांना विनंती असल्याचे बृजभूषण यांनी गुरुवारी म्हटले आहे.









