मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविला हिरवा झेंडा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमांतर्गत आज कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत लहान मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी १० लहान मुलांना पालकां सोबत फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे विशेष बस ने रवाना करण्यात आले. या बसला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखविला.
Bus leaves for Mumbai
१५ एप्रिल २०२३ पासून राज्यामध्ये “शासन आपल्या दारी” अभियान सुरु करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधील कार्यरत वैद्यकिय पथकांकडून सन २०२३-२४ या कालावधीत अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयोगटातील ९६६६८ बालकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. त्यामध्ये एकूण पात्र ४३० मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तसेच या तपासणीमधून गुंतागुंतीच्या व अतिजोखमीच्या हृदय दोष आढळून आलेल्या १० बालकांना त्यांच्या पालकांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता फोर्टीस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई येथे रवाना करण्यात आले. त्यामध्ये २ महिन्याच्या बालकावर गुंतागुंतीची व अतिजोखमीची हृदय शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. योगेश साळे व निवासी वैद्यकिय अधिकारी (बाह्यसंपर्क ), सी. पी. आर कोल्हापूर डॉ. हर्षला वेदक प्रमुख उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्रज्ञा संकपाळ, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक सतिश केळूसकर व सांख्यिकी अन्वेषक प्रियांका कांबळे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्यावेळी सर्व बालकांना व पालकांना जेवण, पाणी बॉटल, बिस्किट व ओ. आर.एस आदीचे वाटप प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.









