तामिळनाडूच्या मंत्र्यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर : द्रमुक पूर्ण करणार स्वत:चे आश्वासन
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी रविवारी राज्याच्या नीटविरोधी विधेयकासंबंधी राज्यपाल आर.एन. रवि यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. राज्यपालांचे या विधेयकाशी आता कुठलेच देणेघेणे नाही, कारण विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
नीट विरोधात तामिळनाडू विधानसभेकडून संमत करण्यात आलेल्या विधेयकाला कधीच मंजुरी देणार नसल्याचे राज्यपाल रवि यांनी शनिवारी म्हटले होते. राज्यपालांकडून विधेयक परत पाठविण्यात आल्यावर राज्य विधानसभेने नीटच्या कक्षेतून तामिळनाडूला सूट देण्याची मागणी करणारे विधेयक पुन्हा संमत केले होते. कुठलाच पर्याय नसल्याने यावेळी राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठविले आहे. यामुळे त्यांचे काम संपले आहे. राज्यपालांचे आता नीटविरोधी विधेयकाशी कुठलेच देणेघेणे नाही. तसेच त्यांच्या सहमतीचीही आता कुठलीच गरज नाही. राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिल्यास याची माहिती राज्यपालांना कळविण्यात येईल असे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या कल्याणकारी पुढाकारांना समर्थन देणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. नीट विरोधी द्रमुक सरकारची भूमिका जनतेच्या भावनांना प्रतिबिंबित करणारी आहे. द्रमुक अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी 2021 मध्ये नीटची सक्ती संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते असे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.









