पणजी : गोव्याचे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी गोव्यातील जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, हा पवित्र सण प्रत्येक घरात आनंद, सुसंवाद आणि समृद्धी घेऊन येवो. श्रीगणेश, विघ्नहर्ता, मंगलमूर्ती हे ज्ञानाचे आणि अडथळ्यांचे निवारण करणारे दैवत आहे. चतुर्थीच्यावेळी आपण गणरायाचे स्वागत करताना सामूहिक प्रगती, कल्याण आणि आव्हानांवर मात करण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी आपण त्यांचे आशीर्वाद घेऊया.
गोव्यात चवथीचा सण केवळ एका उत्सवापेक्षा अधिक आहे. तो आपल्या सांस्कृतिक वारशाचा आणि कौटुंबिक बंधाचा उत्सव आहे. माटोळीच्या प्रदर्शनांपासून ते पारंपरिक मिठाई व प्रार्थनेपर्यंत, तो पिढ्यान पिढ्या सर्वांना भक्ती आणि आनंदाने एकत्र आणतो. हा उत्सव गोव्यातील जीवनाची व्याख्या करणारी एकोप्याची भावना प्रतिबिंबित करतो, असे पुढे राज्यपाल म्हणाले. यंदा चवथीचा सण आपल्याला पर्यावरणपूरक परंपरा जपण्यासाठी, आपल्या समुदायामध्ये सुसंवाद जोपासण्यासाठी आणि ही मूल्ये भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देईल, अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली आहे.









