तामिळनाडूत घडली अत्यंत दुर्मिळ घटना
वृत्तसंस्था /चेन्नई
भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या मंत्र्याला राज्यपालांनी स्वत:हून काढून टाकल्याची घटना तामिळनाडूत घडली आहे. असा प्रकार राज्याच्या इतिहासात प्रथमच घडला असावा, अशी चर्चा आहे. राज्याचे ऊर्जा आणि वीज मंत्री व्ही. सेंथिलबालाजी यांच्या संदर्भात राज्यपालांनी ही कृती केली आहे. बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत. नोकऱ्या मिळवून देण्यासाठी लाच घेणे, मनी लाँड्रिंग असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंदविण्यात आले आहेत. नोकऱ्यांसाठी लाच या प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला नाही. आजही ते मंत्री आहेत. त्यांचे मंत्रिपदावर राहणे कायदा-सुव्यवस्था आणि घटनेचे राज्य या तत्वांसाठी विसंगत आहे. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी त्यांचे मंत्रिपदावर असणे योग्य नाही. ते चौकशीवर प्रभाव टाकू शकतात. अशा स्थितीत त्यांना काढून टाकण्याचा निर्णय राज्यपाल आर. एन. रवी यांनी घेतला आहे, असे पत्रक राज्यपाल भवनातून प्रसिद्धीस देण्यात आले.
राजकीय वादळ उठणार
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मंत्रीपदावरुन कोणालाही काढण्याचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. काही तज्ञांच्या मते राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. तर काही जणांच्या मते त्यांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्य बजावले आहे. या वादामुळे आता हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. सध्या सेंथिलबालाजी रुग्णालयात आहेत.









