भगवान गौतम बुद्धांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष सोहळा
पणजी : थायलँडने बँकॉक येथे भगवान गौतम बुद्धांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सोहळ्dयाचे आयोजन केले असून गौतम बुद्धांच्या तसेच त्यांच्या दोन महान शिष्यांचे नवी दिल्लीत असलेले अस्थिकलश घेऊन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे बँकॉकला पोहोचले असून तिथे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. थायलँड सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बँकॉक येथे गौतम बुद्धांच्या स्मृतीप्रित्यर्थ समारंभाचे आमंत्रण दिले होते. त्यासाठी थायलँडचे पंतप्रधान श्रेष्ठा थिविसिन यांनी केलेल्या विनंतीस अनुसऊन मोदी यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली 22 सदस्यीय शिष्टमंडळ थायलँडला पाठविले आहे. भगवान गौतम बुद्धांचे तसेच त्यांचे परमशिष्य अर्हंत सारिपुत्त आणि अर्हंत मोगल्लान यांचे अस्थिकलश भारताकडे आहेत व भारताने ते जपून ठेवलेले आहेत. थायलँडच्या पंतप्रधानानी मोदींना केलेल्या विनंतीनुसार हे पवित्र अस्थिकलश घेऊन जाण्यासाठी त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखालील 22 सदस्यीय शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांचाही समावेश आहे.
बँकॉकहून दैनिक ‘तऊण भारत’शी बोलताना बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या दोन परम शिष्यांचे अस्थिकलश घेऊन बँकॉकला जाण्याचे हे परम भाग्य आपल्याला लाभले. या दिव्य आणि पवित्र प्रतिकांच्या राष्ट्रीय संग्रहालयात आगमनानंतर भाविकांनी उदंड स्वागत केले. नवी दिल्लीहून खास विमानाने हे शिष्टमंडळ बँकॉकला गेले. विमानतळावर स्वागत करण्यासाठी अनेक बौद्ध महंत मंडळी आली होती. राष्ट्रीय सन्मानाने सर्वांचे पवित्र, असे स्वागत करण्यात आले. राज्यपाल आर्लेकर म्हणाले की, हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असून भारत आणि थायलँड यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध दृढ करण्यासाठी याची फार गरज होती. 23 फेब्रुवारी म्हणजेच आज रोजी बँकॉक येथील राजवाडा परिसरात सनम लुआँग येथे थायलँडचे पंतप्रधान श्रेष्ठा थिविसीन हे पवित्र अवशेषांची अर्चना आणि वंदन करणार आहेत. त्यानंतर माघी पौर्णिमेच्या दिवशी थायलँडमधील जनतेला या पवित्र अस्थिंचे दर्शन घेता येईल. हे अस्थिकलश काही दिवस थायलँडला राहातील. त्यानंतर ते भारतात परत आणले जाणार आहेत. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे गोमंतकीय सुपुत्र असून एवढा मोठा मान प्रथमच एका गोमंतकीयाला प्राप्त झालेला आहे.









