पंजाबमध्ये वाद वाढणार : मान यांच्यावर आरोप
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. राज्यपाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री मान यांच्यावर जूनमध्ये झालेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान प्रतिमा मलीन करण्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री मान हे माझ्यासाठी अपमानास्पद शब्दांचा वापर करत पत्र लिहितात. याप्रकरणी मान यांच्याविरोधात तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मान यांनी सभागृहाबाहेर देखील अशाप्रकारचे आरोप केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 124 अंतर्गत तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलताना शब्दांचा जपून वापर करावा, कुठल्याही कारणाशिवाय मला ते शिवी देऊ शकत नाहीत. राज्यपालांकडे अनेक अधिकार असतात. राज्यपालांकडून मागविण्यात आलेली प्रशासकीय माहिती सादर करण्याचे बंधन मुख्यमंत्र्यांवर आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मार्च महिन्यात या घटनात्मक तरतुदीचा आदर करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांना 10-15 पत्रे लिहिली, परंतु एकालाही उत्तर मिळाले नाही. कुठल्याही प्रकारची माहिती मागविल्यास मुख्यमंत्री मान नाराज होतात. आपण केवळ 3 कोटी पंजाबींसाठी उत्तरदायी असल्याचे मान सांगतात. मान यांना राज्यघटनेनुसार राज्य चालवावे लागणार आहे. मान हे काही बादशाह नव्हेत, असे वक्तव्य पुरोहित यांनी केले आहे.









