वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडू राज्याचे राज्यपाल रविंद्र नारायण रवी यांनी अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी आपलेही ‘शक्तीप्रदर्शन’ केले आहे. मात्र, हे राजकीय शक्तीप्रदर्शन नसून शारिरीक सामर्थ्याचे आहे. त्यांनी योगदिनी जाहीररित्या 51 दंड काढून दाखवून वयाच्या 73 व्या वर्षीही आपण सुदृढ प्रकृती राखली आहे, हे उपस्थितांसमोर सिद्ध केले. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून त्याला असंख्य प्रेक्षक लाभले असल्याचे दिसून येत आहे. दंड काढताना आपल्या शरीराची स्थिती कशी असावी आणि दंड कशाप्रकारे काढावेत, याचा एक वस्तुपाठच त्यांनी त्यांच्या या कार्यक्रमातून सर्वांना दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वयाच्या पंच्याहत्तरीच्या जवळ आलेल्या या राज्यपालांनी या वयातही ही क्षमता दर्शविल्यामुळे त्यांचे अनेकांनी कौतुक केले. तरुणांनाही त्यांचा आदर्श घ्यावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यांनी जेव्हा न दमता किंवा धापा न टाकता, क्षणाचीही विश्रांती न घेता सलग 51 दंड काढून दाखविले. तेव्हा, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संतुलित खाणे, सातत्यपूर्ण प्रतिदिन व्यायाम आणि शुद्ध विचारसरणी यांच्यामुळे प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश त्यांनी दिला.









