राहुल गांधी यांचा हल्लाबोल : आरएसएस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत असल्याचाही आरोप
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
दिल्लीत सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अलायन्सच्या विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर आपला संताप व्यक्त केला. देशातील सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा असूनही केंद्र सरकार या मुद्यावर मौन बाळगून आहे. सरकारच्या या धोरणामुळे भविष्यात कोणालाही रोजगार मिळणार नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
देशभरातील बेरोजगारीच्या मुद्याविरोधात सोमवारी जंतर-मंतरवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अलायन्सच्या विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. विद्यार्थी संघटना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी), नियुक्त्यांबाबत यूजीसीची प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची आणि विद्यार्थी संघटनांची पुनर्स्थापना करण्याची मागणी करत आहे. निदर्शकांमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय), ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), मुस्लीम स्टुडंट्स फेडरेशन (एमएसएफ), समाजवादी छात्र सभा आणि छात्र राष्ट्रीय जनता दल (सीआरजेडी) यांचा समावेश आहे.
‘एक संघटना भारताचे भविष्य, शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे नाव आरएसएस आहे. आपली शिक्षण व्यवस्था हळूहळू त्यांच्या हातात जात आहे. जर शिक्षणव्यवस्था त्यांच्या हातात गेली तर देश उद्ध्वस्त होईल. कोणालाही रोजगार मिळणार नाही’, असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. याप्रसंगी ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही’ असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधी बेरोजगारीच्या मुद्यावर केंद्र सरकारशी शेवटपर्यंत लढण्याची योजना आखत आहेत.
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल करताना देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे म्हटले आहे. सर्व विद्यापीठांमधील कुलगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. जर सर्व काही त्यांच्या हातात गेले तर देश उद्ध्वस्त होईल. आपण सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढायला हवे. दुसरीकडे, देशातील तरुण नोकऱ्यांअभावी खूप चिंतेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.









