विजय सरदेसाई यांचा आरोप : ‘मॉडेल शॅक’ धोरणासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडणार
मडगाव : स्वतःच्या तुंबडय़ा भरण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार गोव्यातील सर्व पारंपरिक व्यवसाय ‘हायजॅक’ करून ते बाहेरच्या लोकांच्या घशात घालू पाहत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात शॅकवाल्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी यासाठी शॅक धोरणासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. शनिवारी शॅकमालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सरदेसाई यांची भेट घेऊन गोवा सरकार जे ‘मॉडेल शॅक’ धोरण आणू पाहत आहे ते पाहिल्यास सरकार पारंपरिक शॅकवाल्यांना विस्थापित करू पाहत असल्याची भीती व्यक्त केली. यावर बोलताना सरदेसाई म्हणाले की, ऍपवर आधारित टॅक्सी व्यवसायाच्या मार्गाने पारंपरिक टॅक्सीचालकांच्या धंद्यावर या सरकारने गदा आणली. किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय त्याचप्रमाणे हे सरकार संपवू पाहत आहे आणि आता त्यांनी शॅकवाल्यांवर हात घालण्याचे ठरविले आहे. पारंपरिक व्यवसायांना सर्वांत जास्त आणि प्राधान्याने संरक्षण मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकार ‘मॉडेल शॅक’ म्हणून जे काही आणू पाहत आहे त्याचा खर्च एक कोटी रुपये असून अशी चार शॅक्स गोव्यात उभी राहणार आहेत. या शॅक्ससाठीच्या लिलावात कुणीही भाग घेऊ शकतो. एवढय़ा मोठय़ा रकमेच्या लिलावात फक्त तारांकित हॉटेलवालेच भाग घेऊ शकतील. असे मोठे स्पर्धक व्यवसायात आल्यास त्याचा फटका पारंपरिक शॅक व्यावसायिकांना बसेल, अशी भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली. शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी यावेळी बोलताना हे धोरण आखताना सरकारने पारंपरिक शॅकमालकांना विश्वासात घेतलेले नाही, असा दावा केला. अशा प्रकारची मोठी शॅक्स आल्यास ती पारंपरिक शॅकवाल्यांचा व्यवसाय खाऊन टाकतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.









