आमदार विजय सरदेसाई यांची टीका, इमारत जतन करण्याची मागणी, पक्ष कार्यकर्ते व अन्य नागरिकांसह केली भिंतींची रंगरंगोटी
मडगाव : हॉस्पिसियो इस्पितळाच्या जुन्या इमारतीला एक इतिहास आहे. ही इमारत म्हणजे वारसास्थळ असून त्याचे जतन व संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र हॉस्पिसियोच्या दुऊस्तीसंदर्भात राज्य सरकार काहीही निर्णय घेत नाही. गेल्या तीन वर्षांपासून तर या वारसास्थळाला दुर्लक्षित करण्यात आले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सरदेसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मडगाव येथील हॉस्पिसियो इमारतीच्या भिंतीची रंगरंगोटी केली. याप्रसंगी सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे नगरसेवक तसेच कार्यकर्ते रंगरंगोटी करण्यात सहभागी झाले होते. यासंदर्भात बोलताना आमदार सरदेसाई यानी सांगितले की, सरकारचे या इमारतीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्यायच आहे व अन्यायाविऊद्ध आवाज उठविणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वव होते. म्हणून इमारतीच्या आवारातील भिंतीच्या रंगरंगोटीचे काम त्यांच्या जयंतीदिनी आम्ही हातात घेतले आहे. हॉस्पिसियोच्या दुऊस्तीबाबतचा प्रश्न विधानसभेतही उपस्थित केला होता. पण विधानसभा अधिवेशनाचा अवधीही सरकार वाढवू पाहत नाही, असे म्हणले. सरकार आरोग्य खात्याला पुरेसा निधी देत नसल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला. पुरेसा निधी मिळत नसल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे तरी काय करणार, असे ते म्हणाले. सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची स्थिती हॉस्पिसियोपेक्षा वाईट झाली आहे. त्यामुळे सरकारने सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन हॉस्पिसियोच्या दुऊस्तीची व इमारत जतन करून ठेवण्याची प्रक्रिया सुरू करावी किंवा ’करितास’सारख्या संस्था जर आरोग्य केंद्र सुरू करून इमारत जतन करून ठेवत असतील, तर त्यांना परवानगी द्यावी, असेही सरदेसाई यांनी सूचविले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ उभारण्यामागे केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हेतू होता. मग तिथे खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सरकार कसा काय करू शकते, असा प्रश्नही सरदेसाई यांनी उपस्थित केला. गोवा सरकारने नष्ट केलेल्या आमच्या सांस्कृतिक वारशाच्या प्रत्येक वीट आणि दगडाचे संरक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनऊच्चार करण्यासाठी माझ्या पक्षातील सहकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि मडगाव तसेच फातोर्डा येथील अन्य रहिवाशांसह हॉस्पिसियो इस्पितळाच्या भिंती पांढऱ्या रंगात रंगवल्या. भिंतींवर राजकीय संदेश लावून त्या विद्रुप करण्याच्या प्रकाराला विरोध करण्याचाही हा प्रयत्न आहे. अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून हे बऱ्याच प्रमाणात केले जात आहे, असे ते म्हणाले.
‘पोलीस फौजफाटा आणला म्हणून घाबरणार नाही’
यावेळी सदर ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे लोकांना काय चालले आहे ते समजू शकले नाही. सुऊवातीस वारसास्थळ असलेल्या जागी रंगरंगोटी करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र नंतर पांढरा रंग फासण्यात येणार असल्याने पोलीस आणि प्रशासनाने हरकत घेतली नाही. आम्ही वारसास्थळांच्या भिंती विद्रुप होण्यापासून वाचवत असून अन्य मतदारसंघांतील आमदारांनीही असे उपक्रम राबवावेत, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला. त्याचबरोबर पोलीस फौजफाटा आणला म्हणून आम्ही चांगले उपक्रम राबविण्याच्या बाबतीत घाबरणार नाही हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देण्यास ते विसरले नाहीत.









