विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित
पणजी : धारगळ-पेडणे येथील तिळारी कालव्याअंतर्गत ओलित क्षेत्रातील ‘काडा’ ची जमीन डेल्टा कॉर्पोरेशनला दिली म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सरकारची खरडपट्टी काढली. ‘काडा’सह कृषी खात्याची मान्यता नसतानाही 3 लाख चौ. मी. जमीन गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) पर्यटन प्रकल्पासाठी देण्यात आली असा आरोप आलेमांव यांनी करून सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना ‘काडा’ ची मान्यता असली तरच प्रकल्पास मंजुरी मिळणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आणि येत्या 15 ऑगस्टपर्यंत ‘काडा’ची बैठक होवून त्यात काय तो निर्णय होईल.
आलेमांव यांनी ओलिताखालील क्षेत्र विकास महामंडळाकडे (काडा) असलेल्या धारगळच्या जमिनीचा विषय प्रश्नोत्तर तासाला उपस्थित केला होता. ती जमीन शेतकऱ्यांची असून तिचे रूपांतर कसे काय करण्यात आले? अशी विचारणा आलेमांव यांनी केली. सुमारे 3 लाख चौ. मी. ‘काडा’चे क्षेत्र रद्द करावे असा प्रस्ताव जलस्त्राsत खात्याकडे ‘काडा’ला दिला होता. शेतकऱ्यांचे हित, त्यांच्या जमिनी जपण्याचे सोडून ती जागा डेल्टा कॉर्पोरेशनला कॅसिनोसाठी देण्यात आल्याचा आरोप आलेमांव यांनी केला.
त्यावर उत्तर देताना मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करीत आहे. सत्य परिस्थिती काय आहे ते त्यांनी प्रथम समजून घ्यावे. ओलिताखालील क्षेत्र कायम रहावे म्हणून सरकार वचनबद्ध आहे. ‘काडा’ ने अजुनपर्यंत ती जागा रद्द केलेली नाही. प्रत्यक्षात ती जमीन शेतकऱ्यांनी विकली असून ती डेल्टा कॉर्पोरेशनने विकत घेतली आहे. तेथे पर्यटन प्रकल्प करण्याचा डेल्टाचा प्रस्ताव आहे. आयपीबीने ‘काडा’कडे अर्ज केला आहे. परंतु ‘काडा’ने त्यावर निकाल दिलेला नाही. ‘काडा’ची बैठक झालेली नाही. ती 15 ऑगस्टपर्यंत किंवा नंतर होण्याची शक्यता शिरोडकर यांनी वर्तवली.









