माजी आमदार अंजली निंबाळकर यांची माहिती : वनखात्याकडून तात्पुरती मदत 60 हजार रुपये नातेवाईकांकडे सुपूर्द : वनमंत्र्यांकडे मदतीसाठी पाठपुरावा
खानापूर : तालुक्यातील चिगुळे येथील शेतकरी विलास चिखलकर (वय 55) यांच्यावर रविवार दि. 30 रोजी अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अस्वलाने जोरदार हल्ला चढविल्याने तोंड आणि इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव अंजली निंबाळकर यांनी चिखलकर यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला असून तात्पुरती मदत म्हणून 60 हजार रुपये वनखात्याकडून देण्यात आले आहेत. तसेच उपचाराचा खर्च शासन उचलणार असून त्यांना सरकारकडून मोठी मदत मिळवून देणार असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या सूचनेवरून खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी आणि जि. पं. माजी सदस्य पांडुरंग देसाई यांनी केएलई रुग्णालयात जखमी विलास चिखलकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती अंजली निंबाळकर यांना देण्यात आल्याने त्यांनी खानापूरच्या वनाधिकारी सुनिता निंबरगी यांच्याशी संपर्क साधून अस्वल हल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि वनमंत्री ईश्वर खांडरे यांची भेट घेऊन अस्वल हल्ल्यातील जखमी विलास चिखलकर यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून याबाबत वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी आपण संपूर्ण अहवालानंतर योग्य मदत करण्याचे आश्वासन अंजली निंबाळकर यांना दिले आहे. तसेच तातडीची वैद्यकीय मदत म्हणून 60 हजार रु. ची मदत वनखात्याकडून देण्यात आली आहे.तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. उपचारानंतर विलास चिखलकर यांच्या अंपगत्वाचा दाखला घेऊन त्यांना इतरही मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन अंजली निंबाळकर यांनी दिले आहे.









