एआयसह इतर डिप्लोमा अभ्यासक्रमांचा समावेश
बेळगाव : उद्यमबाग येथील गव्हर्न्मेंट टूल रुम अँड ट्रेनिंग सेंटरच्यावतीने डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासह इतर नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डिप्लोमा अभ्यासक्रमाला समांतर जीटीआरटी अभ्यासक्रम सरकारने सुरू केला आहे. यामध्ये डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग, डिप्लोमा इन प्रिशियन मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन अॅटोमेशन अँड रोबोटिक व डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अँड मशीन लर्निंग हे चार वर्षांचे अभ्यासक्रम आहेत.
पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझायनिंग हा एक वर्षाचा डिप्लोमा निश्चित करण्यात आला आहे. बेंगळूरनंतर सर्वाधिक औद्योगिक विकास बेळगावचा झाला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला कुशल कामगारांची गरज आहे. यासाठी डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दिले जाते. बरेच अभ्यासक्रम उत्तर कर्नाटकात केवळ याच संस्थेमध्ये शिकविले जातात. व्हीटीयू तसेच इंजिनियEिरगचे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येत असतात. कॉलेजमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, प्रात्यक्षिक वर्ग घेतले जात असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे आवाहन झोनल ऑफिसर बी. जी. मोगेर यांनी केले. यावेळी यल्लाप्पा सौंदत्ती आदी उपस्थित होते.









