वृत्तसंस्था/मुंबई
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (भारतीय जीवन विमा महामंडळ) मधील आपला अधिक हिस्सा विकण्याची तयारी सरकार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्गुंतवणूक विभाग आता या प्रक्रियेच्या तपशीलांवर काम करेल. सध्या सरकारकडे एलआयसीमध्ये 96.5 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. मे 2022 मध्ये कंपनीचा आयपीओ काढण्यात आला होता, ज्यामध्ये 3.5 टक्के हिस्सेदारी विकण्यात आली होती. त्यावेळी शेअरची किंमत 902 ते 949 होती. ज्यामुळे सरकारला सुमारे 21,000 कोटी मिळाले.
पुढील विक्री ओएफएस द्वारे होणार
सूत्रांनी सांगितले की सरकारने ओएफएस (ऑफर फॉर सेल) द्वारे पुढील हिस्सेदारी विक्रीला मान्यता दिली आहे. तथापि, या चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. किती हिस्सा, कोणत्या दराने आणि कधी विकायचा हे नंतर ठरवले जाईल. शेअर बाजाराच्या नियमांनुसार, कोणत्याही सूचीबद्ध सरकारी कंपनीतील 10 टक्के शेअर्स जनतेला विकले पाहिजेत. सध्या एलआयसीमध्ये फक्त 3.5 टक्के समभाग हे जनतेकडे आहेत. याचा अर्थ सरकारला 6.5 टक्केपेक्षा अधिक शेअर्स विकावे लागतील. ज्याची अंतिम मुदत 16 मे 2027 आहे.
एलआयसीचे बाजार मूल्य
सध्या एलआयसीचे बाजार भांडवल सुमारे 5.85 लाख कोटी आहे. बुधवारी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स 924.40 रुपयांवर व्यवहार करत होते.









