नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार : तीन प्रकारच्या गेम्सवर बंदी घालण्याचा विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार ऑनलाईन गेमिंगविरोधात कठोर झाले आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन गेमबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी येत असल्यामुळे सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. तसेच लोकांना व्यसनाधीन बनवणाऱ्या तीन प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर देशात बंदी घातली जाऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत.
ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतराच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकार ऑनलाईन गेम्सवर कठोर पावले उचलत आहे. केंद्र सरकार सध्या तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्यासंबंधी नियमावली देखील ठरवणार आहे. सरकारने बंदी लागू केल्यानंतर सट्टा खेळणाऱ्यांना चाप लागू शकतो. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेम्सचे मुलांना लागणारे व्यसन यादृष्टीने देखील केंद्राचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत सट्टेबाजीच्या खेळावर भारतात बंदी घातली जाऊ शकते. तसेच लोकांना व्यसनाधीन बनवणाऱ्या खेळांवरही बंदी घालण्यात येणार आहे. देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या ऑनलाईन गेमिंग अॅप्सवरही बंदी घातली जाऊ शकते.
नियमावली लागू होणार : राजीव चंद्रशेखर
आम्ही ऑनलाईन गेम्सच्या संदर्भात एक नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत आम्ही तीन प्रकारच्या गेम्ससाठी परवानगी देणार नाही. यामध्ये आर्थिक नुकसान होणारे सट्टेबाजीसारखे खेळ आणि व्यसनाधीन बनवणाऱ्या खेळांचा समावेश असल्याचे केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी…
ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना मोठा आर्थिक फटका बसल्याची उदाहरणेही अलीकडच्या काळात घडलेली आहेत. नुकतेच चीनमध्ये एका मुलीने आपल्या आईच्या खात्यातून ऑनलाईन गेमिंगमध्ये 52 लाख ऊपये उडवल्याचे समोर आले आहे. भारतातही ऑनलाईन गेमिंगच्या नादात मुलांनी आपल्या पालकांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
ऑनलाईन गेम्समधून धर्मांतराला प्रोत्साहन
अलीकडेच ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतर झाल्याचे प्रकरण गाझियाबादमध्ये समोर आले आहे. या प्रकरणाचे थेट कनेक्शन महाराष्ट्राशी जोडले गेले. कारण यामधील एक आरोपी शहानवाज बुद्दो हा मुंब्रा येथे राहणारा होता. ठाणे पोलिसांनी त्याला अलिबागमधून अटक केली असून ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून तो मुलांचे धर्मांतर करणारे रॅकेट चालवत असल्याची माहिती चौकशीतून उघड झाली आहे. शहानवाज हा ऑनलाईन गेम डेव्हलपर होता. तो गेम्सच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकार कठोर पावले उचलत आहेत.
भारत ही गेमिंगची मोठी बाजारपेठ
याआधी पबजी मोबाईल अॅपवर भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. देशाची सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचवणे हे त्यामागचे कारण होते. भारत स्मार्टफोन गेमिंगची एक मोठी बाजारपेठ आहे. 2022 पर्यंत भारतातील गेमिंग मार्केट 135 अब्ज ऊपये होते. नजिकच्या काळात 2025 पर्यंत हा आकडा 231 अब्ज ऊपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.









