विदेशींना दिसणार भारतीय संस्कृतीची झलक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार सध्या जी-20 बैठकांच्या आयोजनाची तयारी करत आहे. या आयोजनांकरता पर्यटन मंत्रालयाने कंबर कसली आहे. पर्यटन, संस्कृती मंत्रालय आता विदेश मंत्रालयासोबत ताळमेळ राखून बैठकांचे आयोजन करण्याची रुपरेषा तयार करत आहे. पर्यटनासंबंधी एकूण 4 महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन होणार असून त्या देशाच्या कानाकोपऱयात पार पडणार आहेत.
पहिल्या बैठकीचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात गुजरातच्या कच्छमध्ये होणार आहे. ही बैठक सचिवस्तरीय असणार आहे. पर्यटनविषयक प्रत्येकी एक बैठक सिलिगुडी आणि गोव्यात होणार आहे. तर चौथ्या बैठकीचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. परंतु पर्याय म्हणून जम्मू-काश्मीरचे नाव देखील समोर येत आहे.
जी-20 च्या या बैठकांवरून संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) रितसर एक यादी तयार केली असून यात प्रत्येक राज्यातील महत्त्वाचे स्थळ तसेच वास्तूंना सामील करण्यात आले आहे. जी-20 शी निगडित बैठका आयोजित होणाऱया ठिकाणी पर्यटन, संस्कृती आणि स्थापत्यकलेशी निगडित कुठल्या गोष्टी विदेशी शिष्टमंडळांना दाखविता येईल याचा निर्णय घेतला जाणार आहे. अशाप्रकारच्या आयोजनांसाठी एएसआयच्या अखत्यारीतील स्थळांना विशेषप्रकारे सुसज्ज केले जाणार आहे. प्रमुख दर्शनीय स्थळांव्यतिरिक्त विदेशी अतिथींना स्थानिक हस्तशिल्प, कला, संगीत आणि भोजन इत्यादींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे.
एएसआय स्वतःची यादी संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून नोडल मंत्रालय असलेल्या विदेश मंत्रालय आणि जी-20 सचिवालयासमोर सादर करणार आहे. नोडल मंत्रालय ज्या शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये बैठकांचे आयोजन होणार आहे, त्याच्या आसपास असणारी प्रमुख ऐतिहासिक स्थळांची निवड करणार आहे. यानंतर अशा स्थळांना विदेशी अतिथींच्या दृष्टीने सज्ज करण्यात येणार आहे. या स्थळांवर व्हीव्हीआयपी व्यवस्था केली जाणार असून याकरता टूरिस्ट गाइड, टूरिस्ट ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर्स, कॅब ड्रायव्हर्सपासून हॉटेलच्या प्रंटलाइन स्टाफपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया आयटीडीसी सध्या या लोकांना कौशल्य प्रशिक्षण देत आहे. यात शिष्टाचार, काम आणि वैयक्तिक स्तरावर साफ-सफाई, कोविड दिशानिर्देश, विदेशी भाषांशी निगडित शिष्टाचार तसेच विदेशी भाषांबद्दल काही प्रमाणात माहिती दिली जात आहे. याच्या अंतर्गत देशभरात 2 हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये आणखी काही प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जी-20 च्या अध्यक्षत्वाच्या अंतर्गत देशभरात एकूण 255 बैठकांचे आयोजन होणार आहे.









