’मुख्यमंत्री गुऊदक्षिणा’ योजनेवरून गोवा फॉरवर्डचे सरकारवर टीकास्त्र
पणजी : स्वकीयांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी प्रमोद सावंत सरकार आता सरकारी अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून ’अॅक्सिस’ नामक खासगी बँकेला मदत करण्याच्या उद्देशाने या कर्मचाऱ्यांचा पगार सदर बँकेतूनच देण्यात यावा असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे मोठा घोटाळा आहे, असा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाने केला आहे. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी सदर दावा केला आहे. 2012 पासून या शिक्षकांचा पगार प्रथम संबंधित संस्थेच्या खात्यात व नंतर संबंधित शिक्षकाच्या खात्यात जमा होत होता. आता त्याच व्यवस्थेला ’मुख्यमंत्री गुऊदक्षिणा योजना’ असे गोंडस नाव देण्यात आले असून त्याअंतर्गत पगार मिळविण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती सदर बँकेला द्यावी लागणार आहे. एवढी वर्षे या कर्मचाऱ्यांना बँकेच्या माध्यमातूनच पगार मिळत होता. त्यात आता अचानक बदल करण्याचे प्रयोजन काय? तसेच त्या व्यवस्थेस ’योजना’ म्हणण्याचे कारण काय? या योजनेच्या नावानुसार प्रत्यक्ष ’गुऊदक्षिणा’ कोण कुणाला देतो? असे अनेक सवाल प्रभुदेसाई यांनी उपस्थित केले आहेत. प्राप्त माहितीनुसार सदर बँकेचे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाशी कनेक्शन असून त्यातूनच हा सर्व घटनाक्रम घडल्याचा संशय प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने पूर्ण पारदर्शकता आणण्याची गरज असून सत्य काय आहे ते सर्व जनतेसमोर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी प्रभुदेसाई यांनी केली आहे.









