कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातून दाखल झालेल्या हजारो पर्यटकांकडून सागरी जलपर्यटनाला विशेष पसंती दिली जात आहे. परंतु सागरी जलपर्यटनाचा हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत सागरी जलपर्यटन बंद राहणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अर्थात बंदर विभागाने तसे निर्देश जारी केले आहेत. समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेऊन नौकाविहार प्रकल्पांना 30 मेपर्यंत एक-एक दिवसाची मुदतवाढ देण्यास शासन उत्सुक नाहीय.
आक्षी, नागाव, अलिबाग, श्रीवर्धन-दिवेआगर, नांदगांव, जुहू, पालशेत, गणपतीपुळे, कर्दे, मुरुड-दापोली, हर्णै, केळशी, आडे-आंजर्ले, लाडघर, नेवरे, पाळंदे, कारंजगांव, मालगुंड, वेलदूर, गोराई, वर्सोवा, कळंब, राजोडी, अर्नाळा, दांडी बीच, कर्ली खाडी, केळवा, चिंचणी, मालवण, मुरुड-जंजिरा, आरावी, काशिद, किहिम, चिकणी, वरसोली, रेवदंडा, देवबाग, वेंगुर्ला, रेडी, उरण, मांडवा, शिरोडा, डहाणू, पारनाका, पालाव, थेरोंडा येथील सर्व साहसी प्रकल्पधारकांना साहसी जलआधारित नौकाविहार प्रकल्प 26 मे पासून 1 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मालवणातील काही पर्यटन व्यावसायिकांनी मांडली आहे. परंतु आपल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याची खात्री त्यांना नाहीय. त्यामुळे यंदाचा सागरी जलपर्यटन हंगाम 25 मेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
खरेतर, 2022 पूर्वी बंदर विभागाने समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेऊन सागरी जलपर्यटनाला 30 मेपर्यंत एक-एक दिवसांची मुदतवाढ दिल्याची उदाहरणे आहेत. बंदर विभागाच्या या निर्णयाचा आर्थिक फायदा येथील नौकाविहार प्रकल्पांना व्हायचा. मालवणचा विचार करता ऐतिहासिक सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूकदारांना या निर्णयामुळे पाच दिवस अधिकचे उत्पन्न मिळायचे. पण 2022 पासून शासनाने ‘बंद म्हणजे बंद’चे कडक धोरण अंमलात आणायला सुरुवात केल्याने त्याचा आर्थिक फटका येथील सर्वच सागरी पर्यटन व्यावसायिकांना बसू लागला आहे. गेली सलग तीन वर्षे 26 मेपासून जलपर्यटनाअभावी होणारा पर्यटकांचा हिरमोड पहावयास मिळतोय. यंदाचा हंगामदेखील त्यास अपवाद नसेल. 26 मेपासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटरस्पोर्टस्, बोटींग आदी नौकाविहार प्रकल्प बंद झाल्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी भ्रमंती, किनाऱ्यावरूनच किल्ला दर्शन, नजीकच्या पर्यटनस्थळांना भेटी, सूर्यास्त दर्शन यावरच समाधान मानावे लागणार आहे.
26 मेपासून बंदीच्या या कठोर निर्णयामागे 2022 मधील एका दुर्घटनेचा संदर्भ दिला जातो. सागरी जलपर्यटन हंगाम समाप्तीच्या आदल्या दिवशी 24 मे 2022 रोजी तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटन नौका उलटून दोघा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यावेळी बंदर विभागाने चौकशीअंती तातडीने दोघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हंगाम समाप्तीच्या अखेरीस घडलेल्या या घटनेनंतर 30 मे पर्यंत समुद्रातील वातावरण पाहून एक-एक दिवसांच्या मुदतवाढीस ‘फुलस्टॉप’ लागलाय तो आजमितीपर्यंत. कारण शासन आणि प्रशासन कोणीही मुदतवाढीची जोखीम घ्यायला तयार नाही. प्रमुख लोकप्रतिनिधीसुद्धा मुदतवाढीच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेताना दिसत नाहीत. कुणी मागणी केलीच तर ‘उगाच रिस्क कशाला’ असा सुरक्षित पवित्रा घेत शासन निर्णयाकडे बोट दाखवतात. स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढतात, अशी गेल्या तीन वर्षातील परिस्थिती आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या ‘तारकर्लीतील दुर्घटना आणि मुदतवाढीस मनाई’ काहीच संबंध नाही, असे बंदर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते 2022 पासून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडे सागरी जलपर्यटनाशी संबंधित प्रकल्पांना परवानगी देण्याची जबाबदारी आली. केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार सागरी जलवाहतुकीस 25 मेपर्यंत परवानगी असते. त्यानंतर पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सागरी जलवाहतूक 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवली जाते. हा नियम सागरी जलपर्यटनालाही लागू होतो. त्यानुसार 26 मेपासून बंदीचा निर्णय लागू होतो. त्यामुळे तारकर्लीतील दुर्घटना आणि मुदतवाढीचा काही संबंध नाही, असे बंदर विभागाचे अधिकारी सांगतात. असो, पण यातही कोकणच्या पर्यटनाविषयीची एक कौतुकाची बाब समोर येते ती म्हणजे, काही पर्यटक असे असतात की, त्यांना 26 मेपासून सागरी पर्यटन बंद होणार असल्याची पूर्ण कल्पना असते. तरीपण ते कोकणात समुद्रकिनारी पर्यटनासाठी येतात. त्यांचे म्हणणे असते की, मुळात आम्हाला कोकण आणि येथील समुद्रकिनाऱ्यांवरील निसर्गरम्य वातावरणाचे खूप आकर्षण आहे. त्यामुळे आपल्या व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढत एकदा तरी आपण कोकणात पर्यटनासाठी गेलेच पाहिजे, अशी खूणगाठ आम्ही मनाशी बांधलेली असते. येथील निसर्गसौंदर्य आणि भोजनाचा आस्वाद घेण्याची मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोकणात येतो. अशावेळी सागरी जलपर्यटन बंद असल्याची माहिती मिळते तेव्हा थोडा हिरमोड होतो. पण कोकणात पर्यटनाचे स्वप्न साकार झाल्याचा मनस्वी आनंद आम्हाला मिळतो, अशा शब्दात ते कोकणच्या पर्यटनाप्रती आपल्या भावना व्यक्त करतात. पर्यटकांच्या या भावना कोकणातील पर्यटनाचे वेगळेपण अधोरेखित करतात. आता 26 मेपासून पावसाळा सुरु होईपर्यंत असे हजारो पर्यटक आपल्याला कोकणात आलेले दिसतील. सागरी जलपर्यटन बंद असले तरी समुद्रकिनारा भ्रमंतीबरोबरंच समुद्रकिनारी होणाऱ्या मासळी लिलावाचा आनंद घेण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी नाही. अशा पर्यटकांमुळे मे महिना अखेरीस कोकणात चांगली आर्थिक उलाढाल होते. यंदाचा पर्यटन हंगामदेखील त्यास अपवाद असणार नाही, हीच सर्वांची अपेक्षा आहे. पण पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सागरी जलपर्यटन हंगामास मुदतवाढ देण्याचा धोका न पत्करणाऱ्या शासन व प्रशासनास काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे, वाहतुकीचे अपुरे नियोजन आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यासारख्या गोष्टींमुळे पर्यटकांचा जो वेळ वाया जातोय तो टाळला गेला पाहिजे. कोकणातील काही प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी पर्यटनवाढीसाठी उपयुक्त नाही. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे रिक्षा व्यावसायिकांनाही नाईलाजास्तव एखाद्या ठिकाणचे भाडे नाकारावे लागते आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे होणारे पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान थांबले पाहिजे. सध्या मान्सूनपूर्व पावसातच कोकणातील अनेक भागात वीजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. ‘पाऊस तासभर अन् वीज जाते दिवसभर’ हे चित्र बदलण्याची गरज आहे.
महेंद्र पराडकर









