मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : आयोगासाठी कर्मचारी नियुक्तीला मंजुरी : ‘गेडा’साठीही अनेक पदे भरण्याचा निर्णय
प्रतिनिधी / पणजी
राज्यात यापुढे सरकारी खात्यांमध्ये भरतीसाठी कर्मचाऱयांची निवड आयोगामार्फतच करण्यात येणार असून या आयोगासाठी लागणाऱया अनेक पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. गोवा उर्जा विकास मंडळ (गेडा) साठीही अनेक पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
काल बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचीही उपस्थिती होती. सरकारी खात्यांमध्ये यापुढे आयोगातर्फेच कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याने आयोगालाच अतिरिक्त कर्मचाऱयांची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रथम तेथे कर्मचाऱयांची पदे मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दुचाकी स्वारालाही हेल्मेटची सक्ती
दुचाकीच्या मागे बसणाऱयांनाही हॅल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याच्या वृत्तासंदर्भात विचारले असता मंत्री गुदिन्हो यांनी त्यास दुजोरा दिला. तसेच सदर हॅल्मेट आयएसआय मार्कचेच असावे लागेल. त्याशिवाय पर्यटकांना भाडय़ाने दुचाकी देणाऱया (रेंट अ बाईक) व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना आयएसआय चिन्हाचे हॅल्मेट द्यावे लागणार आहे. आपले ग्राहक असलेल्या पर्यटकांची सुरक्षा पाहणे हे रेंट अ बाईक व्यावसायिकांचे कर्तव्य असून आयएसआय चिन्हाशिवाय हॅल्मेट सुरक्षित नाही, असे ते म्हणाले.
खासगी वाहने भाडय़ाने दिल्यास कारवाई
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खाजगी दुचाकी पर्यटकांना भाडय़ाने दिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अशी दुचाकी भाडय़ाने दिल्याचे समजल्यास पोलीस आणि वाहतूक खाते सदर दुचाकी जप्त करेल आणि ती परत देण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. राज्यात खाजगी दुचाकी आणि चारचाकी गाडय़ा बेकायदेशीररित्या भाडय़ाने देण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्यासंदर्भात असंख्य तक्रारी पोलीस आणि वाहतूक खात्याकडे पोहोचल्या आहेत. त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी सदर इशारा दिला आहे.
चिंतन शिबिरात मुख्यमंत्री होणार सहभागी
येत्या दि. 27 व 28 ऑक्टोबर रोजी गृह मंत्रालयातर्फे हरियाणा येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. राज्यांशी संबंधित विविध समस्या तसेच पोलिसिंग, सार्वजनिक सुरक्षा, अग्निशमन आदी मुद्यांवर या शिबिरात चर्चा होणार आहे. त्यात मुख्यमंत्री गृह खात्याशी संबंधित विविध समस्या मांडणार आहेत. त्याशिवाय इंग्लंडहून भारतात येणाऱया पर्यटकांना ई व्हिसा बाबत निर्माण झालेल्या समस्येसह अन्य प्रश्नही गृहमंत्र्यांकडे मांडणार आहेत.