1 हजार कोटींचे भांडवल गुंतवणूक करणार : रोजगार, स्टार्टअपना प्रोत्साहन
बेळगाव : ऑटोमोबाईल, यंत्रोपकरणे, विमानासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे देश-विदेशात निर्यात करणाऱ्या बेळगाव शहरात जागतिक माहिती-तंत्रज्ञान (आयटी) केंद्र स्थापन करण्यास सरकार पुढे आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक संपर्क, व्यापाराचे केंद्र असलेल्या, विमान, रेल्वे, बंदर यांच्याशी संपर्क असलेल्या बेळगाव शहरात आयटी-बीटी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1 हजार कोटी रुपयांचे भांडवल गुंतवणूक करण्यासाठी सरकार सिद्ध झाले आहे.
बेळगाव शहरात जागतिक स्तरावरील इंजिनिअरिंग महाविद्यालय असून, येथील विद्यार्थी बेंगळूर, मुंबई या शहरांबरोबरच विदेशातील अनेक कंपन्यांमध्ये कार्य करीत आहेत. प्रतिवर्षी इंजिनिअरिंग, डिप्लोमा कॉलेजमधून हजारो विद्यार्थी पदवी मिळवत असतात. आयटी कंपन्यांना मानव संसाधनाची कमतरता नाही, त्यामुळे जागतिक आयटी केंद्र स्थापण्यासाठी कर्नाटक डिजिटल आर्थिक मिशनने (केडीइएम) सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारच्या विद्यमान माहिती-तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान खात्याने आयटी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयटी पार्क निर्माणासाठी 150 एकर जमीन संपादन
2021 च्या दरम्यान बेळगाव-खानापूर रोडवरील देसूरनजीक आयटी पार्क निर्माणासाठी 150 एकर जमीन संपादन करण्यात आली होती. 40 एकर जमिनीचा विकास करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरीही आयटी-बीटी कंपन्या सुरू झालेल्या नाहीत. या ठिकाणी नव्या कंपन्या सुरू करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे, असे उद्योजकांचे मत आहे.
बेरोजगारांना रोजगारांना प्रोत्साहन मिळणार
बेळगाव शहरात माहिती-तंत्रज्ञान केंद्र स्थापन झाल्यास बेरोजगारांना रोजगार तसेच स्टार्टअपला प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे गोवा व महाराष्ट्राला सोयीचे होणार आहे. सरकारने शहरात आयटी कंपनी सुरू करू इच्छिणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, माहिती-तंत्रज्ञानाच्या स्टार्टअपना सुविधा द्याव्यात, अशीही उद्योजकांची मागणी आहे.
उद्योगांना संपर्क साधण्यासाठी योजना तयार
देशातील डिजिटल आर्थिक वलयात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या हुबळी-धारवाड-बेळगाव (एचडीबी) क्लस्टरवर कियॉनिक्स आयटी पार्क पुनरुजीवनासाठी 20 कोटी रुपये खर्चातून मास्टरप्लॅन व डीपीआर प्रगतीच्या मार्गावर आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र ट्रायजंक्शनमध्ये व्यापार वाढविण्याठी अनुकूल आहे. उद्योगांना संपर्क साधण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती-तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान खात्याच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.









