जिल्हा सीईएन-उपनोंदणी कार्यालयांना गळती, धोकादायक इमारतीत काम करण्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वेळ, अधिकारी-नागरिकांची गैरसोय
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील धोकादायक इमारतीत जिल्हा सीईएन पोलीस स्थानक, उत्तर आणि दक्षिण उपनोंदणी कार्यालय आहे. ही इमारती कौलारू असल्याने गळती लागली आहे. त्यामुळे इमारतीवर ताडपत्री घालण्यात आली असून धोकादायक इमारतीत सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. उपनोंदणी व पोलीस स्थानकासाठी सुसज्ज इमारत बांधून देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश इमारतींना सध्या पावसामुळे गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर धोकादायक इमारतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी शहर आणि तालुक्यासाठी केवळ एकच उपनोंदणी कार्यालय होते. जुन्या उपनोंदणी कार्यालयात अडचण होत असल्याने ट्रेझरी कार्यालयात उपनोंदणी कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. तर दक्षिण विभागासाठी उद्यमबाग येथे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, दक्षिण उपनोंदणी कार्यालयाची इमारत शहरापासून दूर होण्यासह भाड्याच्या खोलीत सुरू असल्याने सरकारचे यासाठी पैसे वाया जात असल्याच्या कारणावरून दक्षिण उपनोंदणी कार्यालयदेखील ट्रेझरी कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून एकाच इमारतीत उत्तर आणि दक्षिण उपनोंदणी कार्यालये सुरू आहेत.
सुसज्ज इमारत उपलब्ध करून घ्या
ही इमारत ब्रिटिशकालीन असल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. तसेच कौलारू इमारत असल्याने पावसाचे पाणी शिरत आहे. जमिनींचे व्यवहार होण्यासह विवाह नोंदणी देखील याच कार्यालयांमध्ये केली जाते. त्यामुळे दररोज विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांची व अधिकाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
इमारतीवर ताडपत्री, तरीही गळती सुरुच
नजीकच आणखी एका जुन्या इमारतीत जिल्हा सीईएन पोलीस स्थानक गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. ही इमारत देखील धोकादायक असून कौलांतून पाणी शिरत आहे. यापूर्वी इमारतीवर ताडपत्री घालण्यात आली होती. मात्र, सदर ताडपत्री खराब झाली असून यंदा ताडपत्रीअभावी पावसाचे पाणी स्थानकात शिरत आहे. तसेच रिसालदार गल्ली येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत बेळगाव तहसीलदार कार्यालय सुरू आहे. या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी पाझरत असल्याने प्रथम आणि द्वितीय दर्जा तहसीलदारांच्या कक्षाबाहेर पाणी साचत आहे. या पाण्यातूनच अधिकारी व नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती जैसे थे असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.









