कर्मचारी-नागरिकांची गैरसोय : महिला-बालकल्याण खात्याच्या इमारतीच्या दर्जाबद्दल संताप : कंत्राटदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : संततधार पावसामुळे शहरातील अनेक सरकारी कार्यालयांनाही गळती लागली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी वर्ग व नागरिकांची गैरसोय होत असून तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण खात्याची इमारत जीर्ण झाली आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे इमारतीला गळती लागली आहे. अशा अवस्थेतच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्याबरोबर नागरिकांनाही या गळतीतूनच ये-जा करावी लागत आहे. महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या इमारतीची दुर्दशा झाल्याने प्रथमत: इमारतीचीच दुरुस्ती करण्याची गरज आहे. शिवाजीनगर येथे असलेल्या या इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. शिवाय खिडक्या आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. जोरदार पावसामुळे सर्वत्र गळती पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय कामांसाठी नागरिकांची दररोज ये-जा सुरू आहे. मात्र, इमारतीची दुर्दशा झाल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
साधारण शंभर वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. मात्र, या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने व्हरांड्यात गळती लागून पाणी साचून आहे. या इमारतीत मूकबधिर मुलांसाठी शाळा भरविली जात होती. मात्र, आता ही शाळा दुसरीकडे स्थलांतरित केली आहे व 1980 पासून महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय येथे कार्यरत झाले आहे. अनेक वेळा अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुर्दशा झालेल्या इमारतीतच काम करावे लागत आहे. एकीकडे शासकीय कार्यालये स्मार्ट होऊ लागली आहेत तर दुसरीकडे महिला व बालकल्याण खात्याच्या इमारतीला गळती लागली आहे.
सध्या इमारतीची दुर्दशा झाल्याने ती वापरण्यास योग्य नाही. या इमारतीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सक्षमीकरण विभाग, जिल्हा दिव्यांग अधिकारी कार्यालय, बालन्यायाधिकरण, शासकीय निरीक्षणालय, दिव्यांग माहिती सल्ला आणि हेल्पलाईन केंद्रे आदी कार्यालये येथे आहेत. यासाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, इमारत धोकादायक बनल्याने कर्मचाऱ्यांनाही चिंतेत रहावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांची माहिती आणि बालकांविषयी संरक्षण यासाठी सतत सीआरपी,अंगणवाडी सेविका व इतर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, इमारतीची दुर्दशा झाल्याने अडचणी वाढत आहेत. याबरोबर पिण्याच्या पाण्याची गैरसोय तसेच शौचालयाचा अभाव असल्याने गैरसोय निर्माण होऊ लागली आहे.
मनपाच्या नवीन इमारतीलाही गळती
महानगरपालिकेची अलीकडेच एक मोठी इमारत उभारण्यात आली आहे. स्थायी समिती चेअरमनसाठी तसेच आमदार यांच्यासाठी या इमारतीमध्ये कक्ष निर्माण केले आहेत. मात्र काही वर्षातच या इमारतीलाही गळती लागली असून मनपाच्या कामाचा दर्जा यावरून उघडकीस येत आहे. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यानंतर बाजूलाच लागून बांधलेल्या इमारतीमध्येही गळती सुरू आहे. त्यामुळे फरशीवरून घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ 5-6 वर्षातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांतून होत आहे.
पोलीस स्थानक इमारतींनाही गळती 
संततधार पावसामुळे सरकारी कार्यालयांनाही गळती लागली आहे. मार्केट व काकतीसह वेगवेगळ्या पोलीस स्थानक इमारतींनाही गळती लागली आहे. जुन्या इमारती असल्यामुळे छतावरून पाणी पाझरते आहे. मार्केट पोलीस स्थानकाच्या व्हरांड्यात पावसाचे पाणी पडते आहे. त्यामुळे पोलिसांना पाण्यातच काम करावे लागत आहे. कामासाठी पोलीस स्थानकात गेलेल्या नागरिकांनाही याचा फटका बसतो आहे. काही खोल्या सुरक्षित आहेत. तर काही खोल्यांमध्ये छतावरून पाणी पाझरू लागले आहे. अनेक पोलीस स्थानकांना नव्या इमारती उपलब्ध आहेत. डीसी कंपाऊंडमध्ये असलेल्या जिल्हा सीईएन पोलीस स्थानकाच्या इमारतीवरील छताला व जुन्या पोलीस मुख्यालयाला प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. काकती पोलीस स्थानकाच्या जुन्या इमारतीलाही गळती लागली आहे.
दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव
इमारत दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नवीन इमारत बांधकामासाठी मागील सरकारने निधीही मंजूर केला होता. मात्र, अद्याप त्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. नवीन इमारत बांधकामासाठी शासनाकडे पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.
-नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक)









