धुळे, पुणे / प्रतिनिधी :
सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीशी तसेच आत्महत्यांशी काहीच देणंघेणं नाही, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी रविवारी येथे केली.
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच शेतकऱ्यांना मदत दिली असती, तर आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असते. मात्र, राज्य सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या निकषावर मदत जाहीर केली. अद्यापही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आणखी किती आत्महत्या बघायच्या आहेत, असा प्रश्नदेखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.
अधिक वाचा : आठ वर्षात दीड हजार कालबाह्य कायदे रद्द
राज्यातील स्थिती भयानक आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना हात कसा देता येईल, याला प्राधान्य असायला हवे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही व्यक्तिगत कामात दंग आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या तसेच नुकसान भरपाईच्या मुद्यावर विरोधकांशी चर्चा केलेली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना लुटणारी योजना आहे. विमा कंपन्यांनी 96 टक्के वाटा हा स्वत:च्या घशात घातलेला आहे. राज्य सरकारला बीड पॅटर्ननुसार पीक विमा योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.