नुकसानग्रस्तांना वेळेत भरपाई : महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा
बेळगाव : गेल्या 20 वर्षांत नेहमी अतिवृष्टी, अनावृष्टी व दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. तब्बल 17 वर्षे दुष्काळ पडला होता. उर्वरित वर्षात अतिवृष्टीचा राज्याला फटका बसला. वीज कोसळून दरवर्षी 50 ते 60 जण दगावू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांची कायमस्वरुपी योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी, प्राणहानी, घरांची पडझड, रस्ते व पुलांचे नुकसान, पायाभूत सुविधांचे नुकसान आदींविषयी माहिती देताना कृष्ण भैरेगौडा पुढे म्हणाले, पावसाचा सर्वाधिक फटका राजधानी बेंगळूरला बसला आहे. सरकारने कायमस्वरुपी योजना राबविण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारींचे व्यवस्थित नियोजन करण्यात येत आहे. एकूण 1100 किलोमीटर कालवे तयार करून पावसाचे पाणी व्यवस्थितपणे बाहेर जावे यासाठी योजना तयार केली आहे. 700 किलोमीटरची कामे पूर्ण केली आहेत. वर्षभरात आणखी 300 किलोमीटरची कामे हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कालव्यांच्या विकासासाठी 3 हजार कोटी रुपय खर्च
कालव्यांच्या विकासासाठी 3 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. राज्यात कायमस्वरुपी कामे राबविण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. बेंगळूर वगळता राज्यातील इतर ठिकाणी अतिवृष्टी, गारपिटीमुळे पीकहानी, प्राणहानी झाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ होता. राज्य सरकारने 800 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. केंद्राकडून येणाऱ्या निधीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 45 लाख शेतकऱ्यांना 42 हजार कोटी रुपये भरपाई दिली आहे.
अतिवृष्टीचे राज्यात 133 बळी
अतिवृष्टीने राज्यात 133 जण दगावले आहेत. वीज कोसळून, पाण्यात वाहून गेलेल्या, तलावात बुडालेल्या नागरिकांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयेप्रमाणे 6 कोटी 64 लाख रुपये भरपाई दिली आहे. राज्यात 714 जनावरे दगावली आहेत. 1 कोटी 20 लाख रुपये भरपाई दिली आहे. 20 हजार 893 घरांची पडझड झाली आहे. 3 हजार 200 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 82 कोटी 20 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. कृष्णा, भीमा, तुंगा, कावेरी काठावर पुरामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता. रस्ते, पूल, शाळा खोल्या, अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. मलनाड भागात 11 हजार 172 कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. 290 काळजी केंद्रात 25 हजार 914 जणांना आश्र्रय दिला होता, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. यंदा भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. कायमस्वरुपी भूस्खलनावर तोडगा काढण्यासाठी 863 ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात योजना राबविण्यात येणार आहेत.









