क्यूआर कोडद्वारे माहिती शेअर करता येणार : मोबाईलमध्ये कुटुंबातील 5 जणांचा तपशील साठवण्याची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (‘युआयडीएआय’) आधार कार्ड डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप तुम्हाला तुमचा आधार नेहमी तुमच्यासोबत ठेवण्याची परवानगी देते. जुन्या एम-आधार अॅपपेक्षा हे वेगळे असून युपीआय पेमेंट्सइतकेच पडताळणी सोपे करते. या अॅपच्या माध्यमातून एकाच मोबाईल फोनवर कुटुंबातील पाच सदस्यांची आधार प्रोफाईल साठवण्याची परवानगी देते. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
देशभरात आतापर्यंत एम-आधार अॅप वापरले जात होते. यातील सुविधांनुसार ते तपशील तपासणे, डिजिटल आधार कार्ड डाउनलोड करणे आणि पीव्हीसी कार्ड ऑर्डर करणे यासाठी वापरले जात होते. मात्र, आता नवीन अॅप वापरकर्त्यांना त्यांची आधार माहिती सुरक्षित ठेवतानाच स्कॅन आणि शेअर करण्याची परवानगी देणार आहे.
नवीन अॅप लाँच केले असले तरी पीडीएफ डाउनलोड किंवा पीव्हीसी कार्डसाठी एम-आधार अॅपचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी किंवा काही अपडेटसाठी, यूआयडीएआय पोर्टल किंवा एम-आधार श्रेयस्कर आहे. मात्र, नवीन अॅप गोपनीयतेला प्राधान्य देत असल्याने ते निवडक प्रकटीकरणाद्वारे फक्त आवश्यक माहिती सामायिक करण्यास उपयुक्त आहे.
2009 मध्ये आधार लाँच केल्यापासून आतापर्यंत जवळपास 130 कोटी लोकांना स्वत:चा आधार क्रमांक प्राप्त झाला आहे. सुरुवातीला कागदी कार्ड होते. त्यानंतर एम-आधार अॅपची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच आता डिजिटल इंडिया अंतर्गत पूर्णपणे डिजिटल अॅप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून सरकार प्रत्येक सेवा ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
नवीन आधार अॅपची वैशिष्ट्यो
ई-आधार अॅपमुळे कागदी प्रत सोबत ठेवण्याची गरज नाही.
तुमचा आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन आवश्यक आहे.
नवीन अॅप पिन किंवा ओटीपीसारखे पूर्णपणे सुरक्षित आहे.
सुरक्षित लॉगिन : बायोमेट्रिक प्रमाणीकरण अॅप उघडेल.
हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणार
इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमचा आधार अॅक्सेस करू शकता.
नवीन अॅपचे फायदे….
हॉटेल चेक-इन, सिम सक्रियकरण किंवा बँक केवायसी जलद होईल.
कुटुंबातील प्रत्येकाची माहिती फोनवर असल्याने व्यवस्थापन सोपे होईल.
निवडक शेअरिंग सुविधेमुळे वैयक्तिक डेटा उघड केला जाऊ शकत नाही.









