सरकारी जमिनीच्या तब्बल 73 भूखंडांची विक्री : मामलेदारांच्या तक्रारीवरुन एफआयआर नोंद,जमीन घोटाळ्य़ाच्या एसआयटीकडे 100 तक्रारी
प्रतिनिधी /पणजी
जमीन घोटाळ्य़ाची सुमारे 100 प्रकरणे एसआयटीकडे (विशेष तपास पथक) आली असून त्यातील 35 प्रकरणात एफआयआर नोंदवून त्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिली आहे. सांगे तालुक्यात सरकारी जमिनीचे 73 भूखंड करुन ते विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले.
वालसन यांनी सांगितले की, आतापर्यंत या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली असून 8 जण जामिनावर सुटले आहेत. गोव्यातील ज्या जमिनींचे मालक हयात नाहीत किंवा ते परदेशात स्थायिक झालेत त्यांच्या जमिनी शोधून काढून त्या बळकावण्यात आल्या आणि त्यांची विक्री करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असून अशी आणखी अनेक प्रकरणे असू शकतात. एसआयटीकडे ती प्रकरणे येत असून त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोवा जिह्यापेक्षा उत्तर गोवा जिह्यात ही प्रकरणे जास्त आहेत. बार्देश तालुक्यात सर्वाधिक प्रकरणे असून त्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. सांगे मामलेदारांकडून तेथील सरकारी जमिनीतील 73 भूखंडांची विक्री झाल्याची तक्रार एसआयटीकडे नोंदवण्यात आली असून त्या प्रकरणी एफआयआर नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जीत आरोलकरांच्या विरोधात आयरीश रॉड्रिग्स यांनी केलेल्या जमीन घोटाळा तक्रारीची चौकशी चालू असल्याचे ते म्हणाले.









