ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव : जमिनीचा ताबा देण्याची मागणी
बेळगाव : बामणवाडी येथील सर्व्हे नंबर 29/बी ही सरकारी जमीन एकाने हडप केली आहे. याची पाहणी करून हडप केलेल्या जमिनीचा ताबा मिळावा, अशी मागणी बामणवाडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी मंगळवारी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिरस्तेदार एस. एम. परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनात म्हटले आहे की, बामणवाडीतील सर्व्हे 29 बी ही सरकारी जमीन सरकारी म्हणून नोंद करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात गेल्या 5 मार्च रोजी तहसीलदारांची भेट घेऊन लेखी मागणीही करण्यात आली होती. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. आता ही जागा एकाने बळकावली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.









