आमदार चंद्रू लमाणी यांचा आरोप : अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आत्महत्या आणि हत्या करण्याचे काम राज्यातील जनतेला दिले आहे काय? गेल्या 19 महिन्यात 6 अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर 700 हून अधिक बाळंतिणी आणि 1100 हून अधिक नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. याला राज्य शासनच जबाबदार आहे असा गंभीर आरोप भाजप सत्यशोधन समितीचे आमदार चंद्रू लमाणी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप सत्यशोधन समितीतर्फे शहरातील शासकीय विश्रामगृहात सोमवार दि. 6 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली, ते पुढे म्हणाले सरकारी रुग्णालयात मृत्यू झालेल्या बाळंतिनींना 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.
याला जबाबदार असलेल्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण खात्याच्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या घटनांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात 1 एप्रिल 2024 पासून 31 डिसेंबर 2024 या काळात 38 माता आणि 369 शिशूंचा मृत्यू झाला आहे. तर 15 डिसेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 42 हजार ताई कार्डांचे वितरण करण्यात आले आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर भाजप राज्य महिला मोर्चा प्रधान कार्यदर्शी डॉ. शोभा निसीमगौडर, राज्य उपाध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी तुंगळ, राज्य कार्यदर्शी डॉ. सोनाली सरनोबत, सोशल मीडिया विभाग राज्य सहसंचालक प्रदीप कडाडी, नितीन चौगुले, सचिन कडी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शिल्पा केकरे, सुभाष सन्नवीरपण्णावर, मनोज पाटील आदी उपस्थित होते.









