आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांचे प्रतिपादन : सरकारकडून मार्गसूची जारी
प्रतिनिधी / बेळगाव
चीनसह वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कर्नाटकातही खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सावधगिरीच्या उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असून दक्षता घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुरुवारी विधानसभेत केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मास्कचा वापर करण्यासह कोरोना प्रतिबंधासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुऊवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून मार्गसूची जारी करण्यात आली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. तांत्रिक सल्लागार समितीतील तज्ञांशीही व्हिडिओ
कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. केंद्र सरकारची मार्गसूची जारी झाल्यानंतर कर्नाटकातही आवश्यक मार्गसूची जारी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तालुका व जिल्हा इस्पितळात संभाव्य कोविड रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. खासगी इस्पितळांनाही ही सूचना करण्यात आली आहे. गेल्या तीन लाटांमध्ये उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट सुस्थितीत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. बूस्टर डोस सक्तीचा करण्यात येणार आहे, असेही डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
कर्नाटकात बहुतांश जणांनी दोन डोस घेतले आहेत.
त्यामुळे बूस्टर डोस सक्तीचे करण्यात येणार आहेत. गावपातळीवर लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी सतत केंद्र सरकारच्या संपर्कात राहून लसींचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. यापूर्वी कोरोनाच्या तीन लाटांचा सामना करण्यात आला आहे. आताही सर्वांच्या सहकार्याने संभाव्य लाटेचा सामना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
खबरदारीचे आवाहन
आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती देण्याआधी कोरोनाविषयी चर्चा झाली. लम्पीस्कीनवर चर्चेच्यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी चीनमधील परिस्थितीचा उल्लेख करीत तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही खूप काही भोगले आहे. कर्नाटकात पुन्हा तशी परिस्थिती येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले. निजदचे बंड्याप्पा काशमपूर यांनी मास्क सक्तीचे करण्याची सूचना केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनीही भाग घेतला. संभाव्य लाटेची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. अनेकांनी बूस्टर डोस घेतला नाही. त्यांनी डोस घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
- संसर्ग नियंत्रणासाठी घेतलेले निर्णय…
- राज्यात स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढविणे.
- सर्दी, खोकला, ताप ऊग्णांची तपासणी करणे.
- मास्क वापरण्यासंबंधी जनजागृती करणे.
- विमानतळावर प्रवाशांची तपासणी वाढविणे.
- गावपातळीवर लसीकरणाचे कॅम्प घेणार.