नऊ माहिन्यांपासून रिक्त लोकायुक्तपद
पणजी : गेली नऊ महिने रिक्त असलेले गोवा लोकायुक्त पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या शोधात सरकार असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी उच्च न्यायालयाला दिली. ही याचिका काल बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणीस आली असता लोकायुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. गोवा लोकायुक्तांच्या नेमणुकीबद्धल सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आशिष चव्हाण आणि न्या. भारती डांगरे यांनी दिले आहेत. ट्रॉजन डिमेलो यांच्या याचिकेवर 13 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत सरकारला अहवाल सादर करावा लागेल. निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरपासून लोकायुक्तपद रिक्त आहे. डिसेंबर 2024मध्ये अंबादास जोशी यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. सुमारे 9 महिने लोकायुक्तपद रिक्त असल्याने भ्रष्टाचार संबंधीच्या याचिकांवरील सुनावण्या ठप्प झालेल्या आहेत. लवकरात लवकर लोकायुक्त नियुक्तीचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिकेत करण्यात आली आहे.








