एआरएआयचे राहुल महिंद्रकर : गोगटे तांत्रिक महाविद्यालयात ईव्ही सेंटर ऑफ कम्पेटन्सचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी असून सध्या जगभरात या क्षेत्रावर अधिक भर दिला जात आहे. भारत सरकारकडूनही इलेक्ट्रिकल क्षेत्रात संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे भविष्यातील संधीचे क्षेत्र म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) पुणेचे जनरल मॅनेजर राहुल महिंद्रकर यांनी केले.
येथील केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये डिसिबल्स लॅबच्या सहयोगाने इव्ही सेंटर ऑफ कम्पेटन्स या केंद्राचे उद्घाटन करून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओला इलेक्ट्रिकलचे डेप्युटी चिफ इंजिनिअर प्रदीप चंद्रशेखरन, डिसिबल्स लॅब प्रा. लि. चे सीईओ व संस्थापक सुरज एस. डी. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ईव्ही तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी सरकारकडूनही पुढाकार घेण्यात येत आहे. संशोधन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून अनुदान दिले जात आहे. यासाठी सरकारने राबविलेले धोरण उपयोगी ठरत आहे. ईव्ही तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेल्या वस्तूंचा पुनर्रवापर व्हावा व प्रदूषण टाळण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. सदर महाविद्यालयाकडून राबविण्यात आलेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ओलाचे अभियंता प्रदीप चंद्रशेखरन म्हणाले, एखादी वस्तू तयार केल्यानंतर त्या वस्तूचा पुनर्रवापर व्हावा यावर भर देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वस्तूंची निर्मिती करून त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे. देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ईव्ही तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने स्टार्टअप्स सुरू करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याबरोबरच सध्याच्या ईव्ही टेक्नॉलॉजी संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होण्यास मदत व्हावी यादृष्टीने ईव्ही सेंटर ऑफ कम्पेटन्सची सोय करण्यात आली आहे. नामवंत कंपन्यांमधील आवश्यक तंत्रज्ञानाला अनुसरून असणारा अभ्यासक्रम समावेश करून विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे.
यावेळी अल्ट्राटाईल्स बेंगळूरचे दिनेश शेट्टी, प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, प्रा. राहुलजी सुर्यवंशी, प्रा. सतीश एन. दोडमनी, प्रा. अविनाश देशपांडे, एचओडी प्रा. पी. व्ही. दातार, डॉ. डी. बी. कुलकर्णी, प्रा. डी. ए. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.









