विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप करणार जोरदार हल्लाबोल : केवळ बेळगाव जिल्हा इस्पितळात 172 नवजात शिशुंचा मृत्यू
बेळगाव : बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळात बाळंतिणींच्या मृत्यूप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजलेली असतानाच बेळगाव जिल्ह्यातही बळ्ळारीपेक्षा वेगळी स्थिती नाही, हे सामोरे आले आहे. गेल्या सहा महिन्यांत 29 बाळंतिणी व 322 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सरकारी इस्पितळात होणाऱ्या या मृत्यूंना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही आकडेवारी केवळ 1 एप्रिलपासूनची आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध इस्पितळात 29 बाळंतिणींचा मृत्यू झाला आहे. तर 322 नवजात शिशू दगावले आहेत. या काळात केवळ बेळगाव जिल्हा इस्पितळातील प्रसूती विभागात 172 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच यासंबंधीची माहिती दिली आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बाळंतिणी व नवजात शिशू मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सांगितले. बळ्ळारी, बेळगावसह संपूर्ण राज्यात सरकारी इस्पितळात झालेल्या बाळ-बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणांचे सरकारला गांभीर्य नाही. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव हे केवळ मेळाव्यात भाग घेण्यातच समाधान मानत आहेत. अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध आकडेवारी लक्षात घेता दरमहा 45 ते 52 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. वजन कमी असणे, व्यवस्थित वाढ न होणे, वेळेत उपचार न मिळणे, न्युमोनिया, श्वास गुदमरणे, अपौष्टिकता आदी कारणांमुळे नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे व प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शरणाप्पा गडेद यांनी सांगितले.
कोलकात्यातील एका कंपनीने पुरविलेल्या सलाईनमुळे अनेक इस्पितळात बाळंतिणींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बाळंतिणींच्या मृत्यूनंतर ही माहिती उजेडात आली होती. त्यामुळे बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळातील औषधसाठ्याची तपासणी करण्यात आली होती. नुकतेच लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील औषध गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. ज्या सलाईनमुळे बाळंतिणींचा मृत्यू झाल्याचे आरोप केला जात आहे, त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अधिकाऱ्यांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. कारण, एप्रिलपासूनच सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या इस्पितळात बाळंतिणींचे मृत्यू वाढले आहेत. एप्रिलमध्येच सरकारी औषध गोदामातून सलाईन वेगवेगळ्या सरकारी इस्पितळांना पुरविण्यात आले होते.
धक्कादायक आकडेवारी जाहीर
बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळात दगावलेल्या पाच बाळंतिणींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळावर लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. तेथील अधिकाऱ्यांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. या पाठोपाठ बेळगावमधील धक्कादायक आकडेवारी जाहीर झाली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांना नाही गांभीर्य
बाळ-बाळंतिणींच्या आरोग्य रक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. बाळंतिणींना अंगणवाड्यांच्या माध्यमातून सकस अन्न पुरविले जाते. तरीही मोठ्या प्रमाणात बाळ-बाळंतिणींचा मृत्यू होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येते. खासगी इस्पितळांची बिले परवडत नाहीत म्हणून गरीब व मध्यमवर्गीय उपचार व प्रसूतीसाठी सरकारी इस्पितळात दाखल होतात. मात्र, या इस्पितळातील केवळ तीन महिन्यातील मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता सरकारी इस्पितळातील व्यवस्था कशी आहे? हे दिसून येते. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावरच उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.









