सहा वर्षांत तीन साड्या : सेविका-मदतनीसांची गैरसोय
बेळगाव : बालकांचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गणवेश देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील सहा वर्षांत केवळ तीन वेळाच सेविका आणि मदतनीसांना गणवेश मिळाला आहे. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांची गैरसोय होत आहे. बेळगाव जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या केंद्रांतील सेविका आणि मदतनीसांना गणवेश वितरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकसमान गणवेश परिणाम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार, राज्य सरकार, एकात्मिक बाल विकास योजना आणि महिला व बालकल्याण खात्यामार्फत प्रत्येकी दोन साड्या दिले जातात. मात्र सहा वर्षांत केवळ तीन साड्या देऊन सरकारने हात झटकले आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वर्षातून दोन वेळा साड्या गणवेश दिला जात होता. मात्र, मागील सहा वर्षांत गणवेश वितरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय वितरित करण्यात येणाऱ्या गणवेशाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 2022 मध्ये यात बदल करून थेट कार्यकर्त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते.
दर्जेदार साड्या द्या
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना हलक्या दर्जाच्या साड्या दिल्या जातात. त्यामुळे काही दिवसातच त्या खराब होत आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्या आठवड्यातून सहा दिवस या साड्या परिधान करतात. त्यामुळे दर्जेदार साड्या देण्यात याव्यात, अशी मागणीही सेविकांनी केली आहे.
कार्यवाही लवकरच
महिला व बाल कल्याण खात्यामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गणवेश दिले जातात. 2024-25 या वर्षांत गणवेश साड्या अद्याप जारी करण्यात आल्या नाहीत. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.
– एच. एच. कोकनूर (उपनिर्देशक, महिला व बाल कल्याण खाते)









