जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ातील सरकारी शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा पंचायत फंडातून 18 कोटी 53 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नादुरुस्त शाळांची लवकरच दुरुस्ती होणार आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही. यांनी दिली आहे.
शाळांना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मात्र अनेक शाळा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. जिल्हा आणि तालुका पंचायतीने चालू शैक्षणिक वर्षात 18 कोटी 53 लाख अनुदान मंजूर केले आहे. यातून स्मार्ट वर्गखोल्या, बांधकाम, दुरुस्ती, डेस्क, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही बसविणे, शौचालय, फर्निचर यासह इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
याबरोबरच अनुदानांतर्गत 974 अंगणवाडय़ांमध्ये स्मार्ट क्लास, फर्निचर, खेळणी, उपकरणे, पाणी, वीज व लहान मुलांना आकर्षित चित्रे रेखाटली जाणार आहेत. 621 प्राथमिक, 58 माध्यमिक, 794 अंगणवाडय़ांचा विकास साधला जाणार आहे. याबरोबरच
प्राथमिक शाळांमधून विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.









