महाराष्ट्र शासन आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने गडहिंग्लजमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होत असून हा कार्यक्रम वेगळ्याच कारणांनी चर्चिला जात आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून चालवल्य़ा जाणाऱ्या सामाजिक संस्थेकडून हा कार्यक्रम राबवला जात असला तरी त्यावर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना स्थान देण्यात आले नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचेच फोटो कार्यक्रम पत्रिकेवर छापण्यात आले आहेत.
शिंदे- फडणवीस सरकारच्या संकल्पनेतून पुढे आलेली ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राज्यभरात राबवला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभऱ दौरे करत आहेत. कोल्हापूरात ही काही दिवसापुर्वी शासकिय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा कार्यक्रम झाला.
आता ही योजना गडहिंग्लज तालुका परिसरात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्याकडून कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यासाठी कार्यक्रम पत्रिकाही छापल्या गेल्या आहेत. पण या पत्रिकांवर महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नसून त्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचेच फोटो झळकले आहेत. कार्यक्रमपत्रिकेच्या या तपशिलावरून राजकिय वर्तुळात एकच चर्चा घडून येत आहे.
काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांचा विसर?
राष्ट्रवादी वगळता महाविकास आघाडीमधील एकाही नेत्याचा फोटो या कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात न आल्यानं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा विसर पडला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे फोटो छापण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो या पत्रिकेत छापण्यात आलेले नाहीयेत.









