केंद्र सरकारचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने स्वत:च्या कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी छोट्या कालावधीचा ‘वाय-ब्रेक-योगा अॅट ऑफिसर चेअर’ घेण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारची सर्व मंत्रालये/विभागांशी संबंधित कार्यालयांमध्ये काम करत असलेल्या कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना नवा योग प्रोटोकॉल स्वीकारण्यास आणि त्याला चालना देण्यास सांगण्यात आले आहे.
योगा ब्रेकमुळे कर्मचारी अधिक उत्तमप्रकारे कामावर लक्ष देऊ शकतील. वाय ब्रेकचा अर्थ कार्यालयात स्वत:च्या खुर्चीवरच योग करण्याशी संबंधित असल्याचे समजते. कार्मिक मंत्रालयाने यासंबंधी हा आदेश काढला आहे.
या आदेशानुसार कार्यस्थळी ‘वाय-ब्रेक’ आयुष मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्याच्या आणि ताजेतवाने करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. या पुढाकाराला मिळत असलेला प्रतिसाद अत्यंत प्रोत्साहित करणारा आहे. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि आयुष मंत्रालयाने स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकामुळे बाहेर जाऊन योगाभ्यास करू न शकणाऱ्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी ही नवी सुविधा आणली आहे.
वाय-ब्रेक संबंधीचा हा आदेश 12 जून रोजी जारी करण्यात आला होता. अधिकारी अन् कर्मचारी आता स्वत:च्या कार्यालयीन खुर्चीवर बसल्या-बसलया छोट्या कालावधीसाठी योगाभ्यास करू शकतात, याला ‘वाय-ब्रेक अॅट वर्कप्लेस योग’ असे नाव देण्यात आले आहे.









