उदगाव /वार्ताहर
धनगर समाजास एस.टी.आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी चौंडी (जि.अहमदनगर) येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उदगांव येथे तालुक्याच्यावतीने सुरू असलेले आंदोलनाची दखल सरकारला घ्यायला लावू. त्याचबरोबर त्याचा तातडीने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.
शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने उदगांव (ता.शिरोळ) येथील माळ भागावरील श्री उदयसिध्द बिरोबा मंदिरात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.बिरोबाच्या नावानं चांगभलं…यळकोट यळकोट जय मल्हार…ना नेता, ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष… अशा घोषणा देण्यात आल्या. या अमरण उपोषणात संदिप उर्फ पिंटू गावडे, दिपक ठोबरे, अमोल मरळे, मल्लाप्पा धनगर हे आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषनाच्या दुसर्या दिवशी आमदार यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मंगळवारी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, दलितमित्र डॉ.अशोकराव माने, धनगर समाजाचे बबनराव रानगे, संदिप कारंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष मुकूंद गावडे यांच्यासह पदाधिकार्यांनी भेट देऊन धनगर आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी पाठिंबा दिला.
यावेळी रामभाऊ बंडगर, अमर पुजारी, दत्ता बंडगर, बाळासाहेब बंडगर, रामचंद्र बंडगर, मनू पुजारी, सुरेश गवंडी, अमोल पुजारी, प्रकाश बंडगर, योगेश पुजारी, संजय अनूसे, श्रावण गावडे, संभाजी शिंदे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील धनगर समाज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.