ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. मराठा आरक्षणाचा जीआर हातात पडेपर्यंत पाणीही पिणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. जरांगेंच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज दुपारी साडेबारानंतर जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी आंतरवाली सराटीत दाखल होणार आहे.
मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. या मंडळाशी चर्चा करण्याची माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि नारायण कुचेंनी शिष्टाई केली. यापूर्वी गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे. सोमवारी झालेल्या सह्याद्रीवरील बैठकीत आरक्षणाबाबत सरकारने काय निर्णय घेतला, हे समोर येईल. त्यामुळे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून आंदोलने केली जात आहेत. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.








