गडहिंग्लज उपविभागातील चित्र : फक्त 24 हजार लाभार्थ्यांना मिळाले प्रमाणपत्र
गडहिंग्लज /रोहित ताशिलदार
राज्यातील महायुती सरकारने एप्रिलमध्ये सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात लाभार्थ्यांच्या घरी जाण्याऐवजी लाभार्थीच शासन दरबारी पोहोचल्याचे चित्र गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात दिसून आले. शासन योजना एका छताखाली योजनेच्या मुख्य उद्देशालाच फाटा दिला असून ‘दारी’ जाण्याऐवजी कागदपत्रांच्या नावाखाली लाभार्थ्यांलाच शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वसामान्य, गरजू लाभार्थ्यांना तालुकास्तरीय ठिकाणी एकत्रित शासकीय सेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला. ग्रामपंचायत, महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य, कृषी, एसटी महामंडळ, नगर परिषदेच्या अंतर्गत सर्व योजनांतील गरजू लाभार्थ्यांना ‘दारी’ जाऊन योजनेचा लाभ द्यावा, असा उद्देश या उपक्रमामागे होता. त्यासाठी लाखो ऊपये खर्च करून गावोगावी प्रशासकीय, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थेच्या मदतीने जनजागृती केली गेली. पण प्रशासकीय पातळीवरील उदासिनतामुळे गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसल्याचे समोर येत आहे. कागदपत्राची जुळवाजुळव होत नसल्याने लाभार्थ्यांचे पुन्हा शासकीय कार्यालयांकडे हेलपाटे सुरू असून तालुकास्तरीय मेळाव्यात फक्त आकडेवारी फुगवण्याचे काम झाल्याचे चित्र आहे.
गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात देखील महसूल विभागाच्या पुढाकाराने शासनाचे अनेक सवलती लाभार्थ्यांना थेट घरात मिळाव्यात, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, शेतकरी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिलेअर अशा जवळपास 15 योजनांचा समावेश आहे. गडहिंग्लज उपविभागात जूनअखेर झालेल्या तालुकास्तरीय मेळाव्यांत 24 हजार 347 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. शासकीय उद्दिष्टानुसार फक्त 60- 65 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या उपक्रमाला गडहिंग्लज उपविभागात कमी प्रतिसाद मिळाल्याने अनेक वंचित लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गावपातळीवर योजना सक्षमपणे राबवण्यासाठी सर्वच विभागांचे सहकार्य आणि सद भावनेची अपेक्षा आहे. पावसाळ्यात थांबलेल्या या उपक्रमाला आता तरी चांगल्या पद्धतीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
तालुकानिहाय लाभ घेतलेले लाभार्थी
गडहिंग्लज – 10 हजार 209
आजरा – 7 हजार 793
चंदगड – 6 हजार 365
संजय गांधी निराधार योजना – 280
उत्पन्नाचे दाखले – 7 हजार 256
राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र – 3 हजार 456
नवीन शिधापत्रिका – 1 हजार 568
प्रतिज्ञापत्र साक्षांकिंत करणे – 4 हजार 238









