मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण
बेळगाव : आपल्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगली घडविणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलून जातीय दंगलींवर नियंत्रण आणले आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी बेळगावला आल्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगली वाढल्या, असा आरोप भाजप करत आहे. याकडे लक्ष वेधता आरोप करणे हे भाजपचे कामच आहे. पण आरोप केले म्हणजे ते सत्य आहे असे नव्हे. शिमोगा येथे दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोलारमध्ये भाजप काँग्रेसविरुद्ध आंदोलन करत आहे, याकडे लक्ष वेधता आंदोलन करण्याचा किंवा निषेध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्याला सबळ कारण हवे आणि कोणतेही आंदोलन हे शांततेनेच जायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याने लिंगायत समाजावर अन्याय होणार, अशी चर्चा आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना आपल्या सरकारमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना एकत्रित घेऊन जाणे हेच आपल्या सरकारचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात आपण आमदारांशी चर्चा करू आणि मगच निर्णय देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले









