गेल्या 36 वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये निवडणुकीवर बंदी
बेळगाव : राज्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार लवकरच आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. गेल्या 36 वर्षांपासून विद्यार्थी निवडणुकीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याबाबत सरकार विचार करत आहे. निवडणुकीदरम्यान होणारे वादविवाद आणि काहीवेळा होणाऱ्या दंगली यांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने या निवडणुकींवर बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठण्याची शक्यता आहे. राज्य सरकारला हा विचार करण्यास काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी हे कारणीभूत ठरले आहेत. तरुणाईमध्ये नेतृत्वगुण वाढावेत व प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध बळकट व्हावेत, या हेतूने विद्यार्थी निवडणूक पुन्हा सुरू करावी, अशी सूचनावजा विनंती राहुल
गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सिद्धरामय्या व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हायकमांडकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर होईल असा आशावाद नॅशनल स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष सालेम अहमद यांनी व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे ते अध्यक्ष असताना 1989-90 मध्ये शेवटची निवडणूक झाली व विद्यार्थी निवडणुकीवर बंदी घालण्यात आली. जर विद्यार्थी 18 व्यावर्षी मतदान करू शकतात तर ते निश्चितपणे निवडणूकही लढवू शकतात, असे ते म्हणाले. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप व रा. स्व. संघाशी संबंधित विद्यार्थी संघटनेचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊन काँग्रेसने विद्यार्थी निवडणूक घेण्याचा घाट घातला असावा, अशीही चर्चा आहे. शिवाय अशा निवडणुकींमध्ये होणाऱ्या मारामारी, वाद आणि पैशांचा अपव्यय यामुळे पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे.









