पालकमंत्री सतीश जारकीहोळी : विविध कामांचे उद्घाटन
बेळगाव : कित्तूर विधानसभा संघाच्या विकासासाठी निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणे निधी मंजूर करून दिला असून अतिरिक्त 2.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व विकासकामांसाठी निविदा पूर्ण केली असून, कामाला चालना देण्यात येणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कित्तूर येथे शनिवारी विविध विकासकामांचे उद्घाटन करून ते बोलत होते. राज्यामध्ये सरकार सत्तेवर येऊन वर्षपूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यानुसार कित्तूरच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. बांधकाम खात्याकडून अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे. बाबासाहेब पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांनी कित्तूर उत्सवासह कित्तूरच्या विकासासाठी अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
भूमीगत गटारी कामे राबविणार
कित्तूर उत्सवासाठी प्रत्येक वर्षी 5 कोटी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याहून अधिक निधी देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे 7.5 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. रस्त्यांच्या विकासासाठी अनुदान मंजूर करण्यात आले असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार विकास कामे हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कित्तूरचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार विनय कुलकर्णी यांनी भूमीगत गटारी कामे राबविण्यात येणार आहेत. या संदर्भातील अहवाल सरकारकडे देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या कामाला सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष निंगाप्पा अरकेरी, शंकर होळी, पुंडलिक निरलकट्टीसह इतर उपस्थित होते.









