‘उटा’, गोमंतक गौड मराठा समाजाचा आरोप : बंदी लवकरात लवकर उठविण्याची मागणी
मडगाव : गोमंतक गौड मराठा समाज आणि ‘उटा’ संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीमागे सरकारचा हात असल्याचा आरोप ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप तसेच गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे यांनी केला आहे. ‘उटा’ ही एसटी समाजासाठीची चळवळ असून त्याला अडविणे तेवढी सोपी गोष्ट नाही. लवकरात लवकर सदर बंदी उठवावी, अशी मागणी उभयतांनी काल सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
’उटा’ची निवडणूक यंदा सप्टेंबरमध्ये होणार आहे. तोपर्यंत विद्यमान कार्यकारिणीने पुढील आदेशापर्यंत सभा घेऊ नये, आर्थिक व्यवहार करू नयेत, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी दिला आहे. या आदेशामुळे गोविंद गावडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रकाश वेळीप यांच्या गटाला धक्का बसला आहे. ‘आम्हाला बंदी उठलेली हवी. कारण समाजबांधवांना सरकारी योजना वा शाळेतील प्रवेश प्रक्रियेसाठी दाखल्यांची आवश्यकता आहे. तसेच ‘उटा’मार्फत राज्य आणि केंद्र सरकार आणि अन्य संबंधित अधिकारिणींकडे पत्रव्यवहार करण्यासाठी बंदी उठविणे आवश्यक आहे’, असे वेळीप यांनी नजरेस आणून दिले.
सरकारचा हात कसा असू शकतो, कारण निर्णय निबंधकांनी दिलेला आहे, अशी विचारणा केली असता सरकारी अधिकारी यामागे आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला असे आपणास वाटते काय, असे विचारले असता, कुठे कुणी दबाव घातला यासंदर्भात तपास करावा लागेल, असे उत्तर वेळीप यांनी दिले. निबंधकांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले जाणार का, अशी विचारणा केली असता त्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय आरक्षण सहा महिन्यांत द्यावे
राजकीय आरक्षण आम्हाला मिळायला हवे, असे वेळीप म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना आरक्षण मिळण्यास होणाऱ्या विलंबावर प्रश्न उपस्थित करताना येत्या सहा महिन्यांत हे आरक्षण मिळवून देण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. समाजावर अन्याय झाला म्हणून भाजपच्या विरोधात मतदानाचे आवाहन समाजबांधवांना करण्यात येईल काय असे गोमंतक गौड समाजाच्या अध्यक्षाला विचारले असता गावडे म्हणाले की, भाजपला मतदान करू नये असे आम्ही सांगणार नाही. समाजबांधवांकडून जशी प्रतिक्रिया येईल त्यानुसार पुढील कृती ठरविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सांगतात की, त्यांचे आदिवासी समाजाशी सामाजिक नाते आहे. मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले त्यावेळी त्यांचे सामाजिक नाते कुठे हरवले होते याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे गावडे पुढे म्हणाले.
भाजपची साथ सोडण्यावर थातूरमातूर उत्तर
मागील काही आठवड्यांत ज्या गोष्टी घडल्या, जशा की, प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोविंद गावडे यांनी भ्रष्टाचाराच्या केलेल्या उल्लेखानंतर त्यांचे मंत्रिपद काढणे, गोमंतक गौड मराठा समाजावर जातीचा दाखला देण्याच्या बाबतीत घातलेली बंदी, नंतर ‘उटा’ संघटनेवर घातलेली बंदी यामागे कोणते तरी षड्यंत्र असल्याचे दिसून येते, असे वेळीप यांनी या सर्व घडामोडींमागे काही कारस्थान आहे असे आपणास वाटते काय असा सवाल पत्रकारांनी केला असता सांगितले. भाजपकडून आदिवासींवर जर अन्याय होत असेल, तर मग भाजपची साथ सोडणार का, असे विचारले असता, समाज संघटना वेगळी आणि पक्ष वेगळा, येणारा काळ काय ते ठरवेल, असे थातूरमातूर उत्तर त्यांनी दिले.
मते मागण्यास येणाऱ्या भाजपला जाब विचारू
गोमंतक गौड मराठा समाज आणि ‘उटा’वर ही बंदी लागू केल्यामुळे आदिवासींना जात दाखला मिळणे बंद झाले आहे. जर बंदी हटवली नाही, तर 2027 च्या विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी येणाऱ्या भाजपला जाब विचारला जाईल. आम्ही गावागावात, वाड्यावाड्यावर जाऊन लोकांना जागृत करू, असा इशारा प्रकाश वेळीप व विश्वास गावडे यांनी दिला.









